ration shop

शिरूर तालुक्यात महिना संपला तरी रेशन धान्य वाटप नाही; भ्रष्टाचार…

शिरूर तालुका

मांडवगण फराटा (संपत कारकूड): महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने गोर-गरिबांची दिवाळी गोड व्हावी म्हणून तातडीने घेतलेल्या निर्णयात आनंदाच्या शिध्यासह नियमित आणि मोफतचे रेशन सर्व रेशन दुकानदारांना वेळेत पाठवून देखील तालुक्यातील अनेक गावांतील गरीब नागरिकांना धान्य दुकानदारांकडून शंभर टक्के वाटपच झाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या सर्व प्रकारामध्ये अनेक भ्रष्टाचार झाल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

कारोना काळात केंद्राकडून सुरु करण्यात आलेले ‘पीएमजेवाय’ मोफतचे धान्य तसेच कार्डधारकांचे नियमित होणारे वाटप आणि आनंदाचा शिधा असे तीन वेगवेगळे वाटप प्रत्येकाला होणे गरजेचे होते. मात्र, शिरूर तालुकयातील अनेक दुकानदारांनी आपले दुकान अद्याप मोकळे केले नसून, नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देऊन माघारी पाठविण्याचे प्रकार घडलेले आहेत. भ्रष्टाचार रोखण्यासाठी तालुकयातील सर्व दुकानदारांना त्यांच्या ईपीएस प्रणालीमध्ये ऑक्टोबर महिन्याचा धान्य कोठा समाविष्ट केलेला ऑनलाईन दिसून येत आहे.

अनेक दुकानदारांनी महिना संपला तरी यातील अर्धा कोठा वाटपही पूर्ण केलेले नाही. आधारद्वारे वाटप होण्यासाठी पॉश मशीनवर अंगठे मॅच होणे आवश्यक असते. परंतु, ऐन दिवाळीच्या सणामध्ये काही गावात मशीनला प्रॉब्लेम सांगून नागरिकांना माघारी पाठविण्याचे प्रकार घडले आहेत. अनेक नागरिकांचे अंगठे अद्यापही घेतले गेले नाहीत. दुकानदारांनी मशीनचे कारण पुढे करून रेशनिंग वाटप न करता गरिबांची दिवाळी घालवली असून, नागरिक गावात एकमेकांना धान्य कधी वाटप होणार? असा प्रश्न विचारात आहेत. धान्य कधी येते, किती येते, केव्हा वाटप होते, आणि किती धान्य मिळणार? हे भोळ्या-भाबड्या नागरिकांना थांगपत्ता अनेक दुकानंदार लागू देते नाहीत. या महिन्यातील धान्य वाटपात मोठा घोटाळा व त्रुटी असल्यामुळे अधिकारी पुरवठा विभाग फक्त भग्याची भूमिका घेत आहे काय? असा संतप्त सवाल जनता करीत आहे.

शिरूर तालुका डॉट च्या पत्रकाराचा फोन घेत नाही…
दरम्यान, शिरूर येथील निवासी नायब तहसीलदार गिरीगोसावी यांच्याकडे रेशन वाटपाबाबत चौकशी केली असता, असा प्रकार होत असेल तर त्याची आम्ही माहिती घेऊ व चौकशी करू असे सांगितले. मात्र, पुरवठा विभागातीलच एका जबाबदार कर्मचाऱ्याला या प्रकारबाबत विचारणा केली असता दोन वर्षांपूर्वी वस्तुस्थितीबाबत दिलेल्या बातमीचा राग मनात धरून शिरूर तालुका डॉट च्या पत्रकाराचा फोन घेत नसल्याचे सांगितले. या प्रकाराबाबत पुरवठा विभाग आढी ठेऊन काम करीत आहे काय? असा सवाल यानिमित्त निर्माण झाला आहे.
(क्रमश:)