तळेगाव ढमढेरेत गुणीजनांचा गौरव सोहळा

शिरूर तालुका

ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठानचा अमृत महोत्सवानिमित्त उपक्रम

शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठान व संशोधन केंद्राच्या समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या गौरव सोहळ्यात विविध क्षेत्रातील गुणीजन मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता समारंभ नुकताच पार पडला असून विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी मान्यवरांच्या उपस्थितीत ढोल ताशांचा गजरात तिरंगे उंचावत प्रभातफेरी काढली. दरम्यान हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारकात हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सद्गुरु सुमंतबापू हंबीर होते. या कार्यक्रमात सुमंतबापू हंबीर व ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव भुजबळ यांच्या हस्ते हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे वंशज उमाकांत पिंगळे, रमाकांत पिंगळे, पॅरा कमांडोपदी नियुक्त झालेले प्रमोद भोसुरे, तळेगाव ढमढेरे परिसरातील पत्रकार प्रा. नागनाथ शिंगाडे, प्रविणकुमार जगताप, प्रा. एन.बी. मुल्ला, शेरखान शेख, जालिंदर आदक, सुनिल पिंगळे, मयूर भुजबळ, घनश्याम तोडकर तसेच परिसरातील २३ माजी सैनिक, १४ आशा सेविका व २१ अंगणवाडी सेविकांचाही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ, भाजपाचे प्रदेश पदाधिकारी नविन सिंह, ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मंगलाताई भुजबळ, समता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र ढमढेरे, शिरुर बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास ढमढेरे, खरेदी विक्री संघाचे संचालक शहाजी ढमढेरे, माजी उपसरपंच नवनाथ ढमढेरे, उमाकांत पिंगळे, रमाकांत पिंगळे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किरण झुरंगे यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य बाळासाहेब चव्हाण यांनी केले आणि ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव भुजबळ यांनी आभार मानले.