विद्यार्थ्यांनी हंसाप्रमाणे दृष्टी ठेवावी; तुकाराम शिरसाट

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): प्रत्येक विद्यार्थ्यांकडे हंसा प्रमाणे उत्कृष्ट शोधण्याची दृष्टी असायला हवी. ती विकसीत होण्यासाठी विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयात अडकून न पडता वाचनीय पुस्तके वाचावीत तसेच आत्ताच्या सोशल मीडियाच्या मोहजालात न अडकता ग्रंथालयाशी मैत्री करून सातत्याने नवनवीन पुस्तके वाचून हंसाप्रमाणे दृष्टी ठेवावी, असे मत प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी व्यक्त केले.

मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ होईल. सध्या तरुण मोबाईल मध्ये स्वतःला अडकून घेत असून हे चित्र बदलायचे असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही. याची जाणिव विद्यार्थ्यांना योग्य वेळी करून देणे महत्वाचे असून प्रत्येक कुटूंबात वाचनाचे जागरण झाल्यास आपले जीवन नक्कीच यशस्वी होईल असे देखील प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी सांगितले.

दरम्यान डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करत विद्यार्थ्यांनी सामूहिक रीतीने पुस्तकांचे वाचन केले. तर किशोर गोगावले यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याचा संक्षिप्त परिचय करून दिला तसेच प्रतीक्षा पल्हारे, रघुनाथ दातीर, रुपाली नागवडे यांसह आदी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

तसेच प्राचार्य तुकाराम शिरसाट यांच्या प्रयत्नातून सुरू केलेला शालेय समृद्धग्रंथालय या उपक्रमात ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रशालेला पुस्तके भेट दिली त्या विद्यार्थ्यांना याप्रसंगी लेखणी बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन किशोर गोगावले किशोर यांनी केले तर पांडुरंग गायकवाड यांनी आभार मानले.