पंचायत समिती शिरूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): पंचायत समिती शिरूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात व आदरभावाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास पंचायत समितीतील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती स्वाती घावटे होत्या. यावेळी गटविकास अधिकारी महेश डोके, सहाय्यक गटविकास अधिकारी लहामटे, गटशिक्षण अधिकारी तसेच पशुधन विकास अधिकारी निर्मला चोभे, बाल विकास प्रकल्प अधिकारी सटाले, विस्तार अधिकारी शिक्षण बाळकृष्ण कळमकर यांच्यासह पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या जीवनकार्यावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी काकडे सर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनप्रवास, सामाजिक न्यायासाठी केलेले कार्य आणि संविधान निर्मितीत दिलेले अमूल्य योगदान यावर प्रभावी भाष्य केले. त्यांच्या खास शैलीतील मार्मिक व विचारप्रवर्तक मांडणीमुळे उपस्थित श्रोत्यांना प्रेरणा मिळाली.

कार्यक्रमात आणखी एक विशेष उपक्रम म्हणून कक्ष अधिकारी संदीप घायवट यांनी स्वखर्चातून उपस्थित सर्व मान्यवर, अधिकारी व कर्मचाऱ्यांना डायरी व पेनचे वाटप केले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.समारोप प्रसंगी मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा अंगीकार करून समाजात समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत