परिवहन विभागाच्या कारभारावर काँग्रेसचा हल्ला; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या राजीनाम्याची मागणी

महाराष्ट्र

मुंबई: राज्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने परिवहन विभागावर जोरदार टीका करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत निवेदन जारी करून राज्य सरकार रस्ता सुरक्षेबाबत पूर्णतः अपयशी ठरल्याचा आरोप केला.

मुरबाड–कल्याण मार्गावरील इको कार अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ११ जणांना काँग्रेसकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी किमान १५ लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या अपघातासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असेही सपकाळ यांनी नमूद केले.

राज्यात अनेक ठिकाणी वाहनांची क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक सुरू असून, त्याकडे परिवहन विभाग व पोलिसांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला. हप्ते संस्कृतीमुळे नियमांचे उल्लंघन वाढले असून, त्यातूनच अपघातांना खतपाणी मिळत असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. तसेच, मंत्री सरनाईक यांनी जनतेच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याऐवजी इतर राजकीय मुद्द्यांमध्ये वेळ घालवला, असा टोला सपकाळ यांनी लगावला.

अपघातांमध्ये वाढ चिंताजनक

राज्यातील महामार्गांवरील अपघातांचे प्रमाणही वाढत असल्याचे काँग्रेसने निदर्शनास आणले आहे. मुंबई–पुणे एक्सप्रेस वे आणि नागपूर–मुंबई समृद्धी महामार्ग यांसारख्या प्रमुख मार्गांवर वारंवार अपघात होत असल्याचे सांगण्यात आले.

उपलब्ध आकडेवारीनुसार,

२०१९ मध्ये राज्यात रस्ते अपघातांमध्ये १२,७८८ मृत्यू झाले होते.

२०२४ मध्ये ही संख्या वाढून १५,७१५ झाली.

समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या देखील वाढतीच आहे.

२०२४ मध्ये १३७ अपघात

२०२५ मध्ये १८५ अपघात

मृतांचा आकडाही १२६ वरून १५२ पर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात आले.

काँग्रेसच्या मते, अपघातांची ही वाढ ही परिवहन विभागाच्या निष्क्रियतेचे द्योतक आहे. २२ जानेवारी २०२६ रोजी परिवहन आयुक्तांनी जारी केलेल्या निवेदनात अपघातांची खरी स्थिती दडवण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप करण्यात आला.

“जनतेच्या जीवाशी खेळ”

परिवहन विभागाने अपयश झाकण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली असून, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे या प्रकरणात तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत