सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी खुर्ची सोडून जनतेसमोर याव

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालु्क्यातील मलठण -आमदाबाद रस्ता व कोंढण ओढा पुलाच्या नित्कृष्ठ कामामुळे सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांचा बेमुदत उपोषणचा आज “३रा,दिवस” व “सत्याग्रहाचा आज “१०वा. दिवस” असून दिवसरात्र हे सामाजिक आंदोलन सुरूच आहे. पुणे मुख्य अभियंत्यांनी खुर्ची सोडून जनतेसमोर यावं, पुरावे पहावेत, मागण्या ऐकाव्यात.न्याय देता येत नसेल तर खुर्ची खाली करावी अशी मागणी उपोषणकर्ते निलेश वाळुंज व जनतेची आहे.

निलेश वाळुंज हे सत्यागह आंदोलनाला बसल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ मलठण- आमदाबाद या खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे करून घेतले आहे. तसेच कोंढणओढा येथील पुलाच्या वरील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे निलेश वाळुंज यांच्या लढ्याला हे यश मानले जात आहे.

शिरूर तहसील कार्यालयात हे सत्याग्रह आंदोलन,उपोषण सुरूच असून घटनास्थळी वेळोवेळी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे हे भेट देत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपविभागीय अभियंता सूर्यकांत कुंभार, सहायक अभियंता अनिल जाधव यांनी वाळूज यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. तथापि, या रस्त्याच्या कामाची मुख्य अभियंत्यांनी या रस्यावर येऊन समक्ष पाहणी करावी, अशी आग्रही ठाम मागणी करीत वाळुंज यांनी सत्याग्रह आंदोलन उपोषण मागे घेण्यास ठाम नकार दिला आहे.

या आंदोलनाला मंगळवारीही विविध संस्था संघटनांनी पाठिंबा दिला. मंगळवारी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी या रस्त्याची समक्ष पाहणी केल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार वाळूज यांनी व्यक्त केला. तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता बी. एस. गाडेकर, पोलिस उपनिरीक्षक हनमंत नकाते यांनी सायंकाळी वाळुंज यांच्याशी मागण्यांबाबत चर्चा केली. मात्र, जनतेच्या समस्यांविषयी देणेघेणे नसलेले वरीष्ठ अधिकारी समाजाला वेठीस धरीत असून, जनतेच्या कष्टाच्या पैशांतून झालेल्या निकृष्ट कामाची पाहणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे वाळूज यांनी स्पष्ट केले.

जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, मनसेचे तालुका संघटक अविनाश घोगरे, माजी नगरसेवक विठ्ठल पवार, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब शिवले, प्रीतेश फुलडाळे, शिवसेनेचे तालुका संघटक सुदाम चव्हाण, टाकळी हाजीचे माजी सरपंच दामूशेठ घोडे, सावळेराम आवारी, संदीप कुटे, अॅड. माया गायकवाड, सोमनाथ भगत, अॅड. सुप्रिया साकोरे, विजय शेलार, प्रमोद गायकवाड, दत्तात्रेय बांगर, भाऊसाहेब लाळगे आदींनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

दरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची स्वीय सहायक दत्ता आवारी, हिंद स्वराज ट्रस्टचे सदस्य नाना आवारी यांनी दुपारी वाळूज यांची भेट घेऊन अण्णांचा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

मुख्य अभियंता,पुणे यांनी समक्ष येऊन रस्त्याची पाहणी करावी. दोषींवर कारवाई करावी अशी मागणी उपोषणकर्ते निलेश वाळूज यांची आहे. त्याच्या या मागणीबाबत वरिष्ठांना पत्रव्यहार केला असून याबाबत वरिष्ठ लवकरच निर्णय घेतील. खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम ठेकेदाराकडून करून घेण्यात आले आहे.

सूर्यकांत कुंभार -उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग