केंदूर ग्रामस्थांकडून आनंदाने धरणाच्या पाण्याचे पूजन
शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) सह पाबळ भागाला वरदान ठरलेले थिटेवाडी धरण २ वर्षांपासून कोरडे पडलेले असल्याने धरण भरण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असताना २ वर्षांनी सदर धरण शंभर टक्के भरल्याने ग्रामस्थांकडून पाण्याचे पूजन करण्यात आले आहे.
केंदूर (ता. शिरुर) सह पाबळ या दुष्काळी भागातील गावासाठी थिटेवाडी धरण वरदान ठरले आहे, येथील धरणामुळे शेतकऱ्यांची शेती ओलिताखाली आलेली आहे, या धरणात पाणी नसल्यामुळे केंदूर व पाबळ या दोन्ही गावच्या पाणी पुरवठा योजना बंद पडतात तसेच नागरिकांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या देखील समस्या निर्माण होतात. मात्र गेली २ वर्षे हे धरण भरले नव्हते. मात्र तब्बल २ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर येथील धरण शंभर टक्के क्षमतेने भरले.
शुक्रवार (दि. ५) रोजी संध्याकाळच्या सुमारास धरण पूर्ण क्षमतेने १०० टक्के भरुन धरण ओसंडन वाहू लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले तर धरण पूर्ण भरल्यानंतर केंदूरचे सरपंच अविनाश साकोरे, उपसरपंच योगिता थिटे, माजी सरपंच बाबुराव साकोरे, पाणीदार प्रकल्पाचे समन्वयक भाऊसाहेब थिटे, उमेश साकोरे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल ताथवडे, अक्षता साकोरे, गणेश थिटे, रोहिदास गावडे, कैलास थिटे यांसह आदींनी धरणाच्या पाण्याचे पूजन केले असून धरण १०० टक्के भरल्याने येथील शेतकरी आनंदित झाले आहे.