शिरुर तालुक्यातील या गावात दुसऱ्यांदा तेच घर पडून महिला जखमी

क्राईम

पाच वर्षापूर्वी घर पडूनही शासनाची कुटुंबासाठी अनास्था

शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) येथील ठाकरवाडी येथे ५ वर्षापूर्वी पावसाने एक घर पडून बालकाचा मृत्यू झालेला असताना त्या कुटुंबाला अद्याप शासकीय मदत मिळालेली नसताना पुन्हा तेच घर पडून कुटुंबातील एक महिला जखमी झाली असल्याची घटना घडली असल्याने कुटुंब पुन्हा शासकीय मदतीच्या प्रतिक्षेत आहे.

केंदूर (ता. शिरुर येथील ठाकरवाडी येथे रामा रावबा गावडे यांचे घर पावसामुळे पडले असुन कुटूंबातील महिला जखमी झालेल्या आहेत. यापूर्वी पाच वर्षांपूर्वी याच कुटूंबावर घर पडून घरामध्ये एक लहान मुलगा मृत्युमुखी पडला होता तर मुलाची आई पोटावर दगड पडून जखमी झाली होती आणि मयत मुलाच्या आजीला डोक्यात मार लागला होता. त्यावेळी उद्योजक गणेश थिटे यांनी केंदूर गावचे तलाठी, ग्रामविकास अधिकारी, केंदूर ग्रामपंचायत, शिरुर नायब तहसीलदार यांची प्रत्यक्ष भेट घेत पंचनामा केला होता. मात्र अद्याप सदर कुटुंबाला शासनाची कोणतीही मदत मिळालेली नाही. २ दिवसात नुकत्याच झालेल्या पावसामुळे पुन्हा पाच वर्षानंतर तोच प्रसंग गावडे कुटुंबावर दुसऱ्यांदा आलेला आहे. पुन्हा तेच घर पडून घरातील एक महिला जखमी झालेली असून सदर महिलेवर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले.

मात्र आदिवासी ठाकर समाजातील गावडे कुटूंब शासनाकडे पुन्हा पंचनामा करुन मदतीची अपेक्षा करत आहे. मात्र मदत नाहीच मिळाली तर पुन्हा दगड मातीत घर उभे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रामा गावडे यांनी सांगितले. तसेच प्रशासनाच्या माध्यमातुन अशा गरीब कुटूंबाना पक्के घर मिळण्याची अपेक्षा देखील येथील नागरीक करत आहेत .