वाजेवाडी गाव पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतले दत्तक

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): वाजेवाडी (ता. शिरुर) हे शिरुर तालुक्यातील छोटेसे असलेले गाव यापूर्वी खासदार गिरीश बापट यांनी दत्तक घेतलेले होते. सध्या सदर गाव पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दत्तक घेतले असल्याने गावच्या विकासाला गती मिळणार असल्याचे माजी उपसरपंच अमित सोनवणे यांनी सांगितले.

वाजेवाडी (ता. शिरुर) हे शिरुर तालुक्यातील लहानसे असलेले गाव गावामध्ये विकास करुन गाव आदर्श करण्यासाठी यापूर्वी खासदार गिरीश बापट यांचे स्वीय सहाय्यक असलेले अमित सोनवणे यांच्या माध्यमातून खासदार गिरीश बापट यांनी सदर गाव दत्तक घेतले असल्याने गावामध्ये मोठा विकास निधी उपलब्ध होऊन गावातील विकास कामांना गती मिळाली होती.

सध्या गावातील यात्रेबाबत निमंत्रण देण्यासाठी माजी उपसरपंच अमित सोनवणे व काही पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेत गावची माहिती दिली असताना पालकमंत्र्यांनी आपण देखील सदर गाव दत्तक घेत असल्याचे जाहीर केल्याने ग्रामस्थांमध्ये ऐन यात्रेच्या वेळी आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाजेवाडी गाव दत्तक घेतल्याने नुकतेच विधान परिषदेचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी चंद्रकांत पाटील यांचे आभार मानत गावामध्ये 10 लक्ष रुपये निधीतून बैलगाडा घाट व गायरान मध्ये 25 लक्ष रुपये निधीतून क्रिकेट मैदान तयार करण्याची विनंती केली आहे, तर सध्या गावातील सर्व विकास कामे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लावली जाणार असल्याची माहिती माजी उपसरपंच अमित सोनवणे यांनी यांनी दिली आहे.