शिरुर तालुक्यात आदर्श सरपंच पुरस्काराचे फुटलेय पेव

मुख्य बातम्या शिरूर तालुका

अर्थाजन करुन मिळवला जातोय “आदर्श सरपंच पुरस्कार” 

शिरुर (तेजस फडके): पुर्वी गावचा सरपंच म्हटल की, झुपकेदार व पिळदार मिशा, धोतर, कुर्ता, पायतान, जाकीट, डोक्यावर टोपी अथवा पटका असा पेहराव असलेला भारदस्त व्यक्ती असायचा त्याला गावात राजकीय विरोध असला तरी गावातील सर्वजण त्या व्यक्तीला मान सन्मान आणि त्याच्या शब्दाला किंमत द्यायचे. माञ काळ बदलला तस राजकारण देखील बदलल ” धोतर नेसुन राजकारण करणारी जुनी पिढी कधीच मागे पडली असुन त्यानंतर पायजामा आणि आता जीन्स पॅन्ट घालणारी पिढी राजकारणात आली आहे.

माजी ग्रामविकास मंञी स्वर्गीय आर आर पाटील यांनी स्वच्छता अभियान व निर्मल ग्राम या संकल्पनांचा वापर करुन गावोगावी स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. गावची स्वच्छता करुन आपल्या गावाला एका आगळ्या वेगळ्या दिशेने घेऊन जाणाऱ्या संबंधित ग्रामपंचायतींना योग्य बक्षिस आणि सरपंचाना “आदर्श ” सरपंच पुरस्कार देऊन गौरवण्यात येत असे. त्यावेळी असे आदर्श सरपंच तालुक्यात बोटावर मोजण्या इतके असायचे. कारण त्यांच्या कामातुन त्यांनी आदर्श निर्माण केलेला असायचा. हा “आदर्श सरपंच पुरस्कार” त्यांना गावाने किंवा शासनाने दिलेला असायचा. माञ हल्ली पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील गावोगावच्या गल्लीबोळात व सोशल मिडियावरही ही “आदर्श सरपंच” नावाची जमात स्वतःला मिरवताना दिसायली लागली आहे.

सध्या पुणे जिल्हा हा सर्वच बाबतीत सधन झाल्याने प्रत्येकाला सत्तेची लालसा निर्माण झाली आहे. पुर्वी गावचं सरपंच पद हे पाच वर्ष असायचे परंतु अलीकडच्या काळात मोठेपणा मिरविण्यासाठी अनेक गावात सरपंच पद हे एक-एक वर्षासाठी वाटून घेऊ लागले. त्यामुळे राजकारणातील सरपंच पदाचा दबदबाच कमी झाला. सरकारने कायदा करुन सुद्धा एखादी महिला सरपंच झाली की तिच्या पतीची ग्रामपंचायत मध्ये ढवळाढवळ वाढत असुन सरपंचचा पतीच नथीतुन तीर मारण्यासाठी सज्ज असतो. विशेष म्हणजे ज्यांना साधी स्वतःची सही सुद्धा येत नाही.अशाही महिला सरपंचाना “आदर्श सरपंच ” पुरस्कार देण्यात आले आहेत हि विशेष बाब आहे.

त्यातच सध्याचे ग्रामपंचायतचे पदाधिकारी हे कोणत्या तरी राजकीय पक्षाचे पदाधिकारी असतात. त्याच बरोबर यातील बहुतांशी सरपंच हे जमिन खरेदी- विक्रीच्या व्यवसायात किंवा अन्य काही तरी व्यवसाय करतात. त्यात त्यांनी कोणाची तरी अर्थिक फसवणूक केलेली असते किंवा ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार केलेला असतो. मग कोणत्या निकषावर त्यांना “आदर्श सरपंच” पुरस्कार दिला जातो हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. अनेक सरपंचांच्या हातात सतत गुटख्याची पुडी आणि राञी दारुची बाटली असते. मग अशा एक ते दिड वर्षांचा कार्यकाळ लाभलेल्या पेताड सरपंचाना “आदर्श सरपंच ” कोण म्हणणार…?

परंतु सध्या शिरुर तालुक्यात अनेक ग्रामपंचायत मध्ये आर्थिकदृष्ट्या सधन असलेले पुरुष किंवा त्यांच्या पत्नी सरपंचपदी विराजमान असल्याने हिच संधी ओळखून अहमदनगर जिल्ह्यातील एक ठग सध्या पुणे जिल्ह्यासह राज्यभरातील सरपंचाना “आदर्श सरपंच पुरस्कार” देत सुटला आहे. मागील काही महिन्यात भास्कर पेरे पाटील, निशिगंधा वाड या सारख्या दिग्गजांच्या उपस्थितीत हे पुरस्कार सोहळे अहमदनगर येथे पार पडले आहेत.

संबंधित व्यक्ती हा मोठ्या मोठ्या राजकिय पुढाऱ्यांसोबतचे मंञालयातील स्वतःचे फोटो सरपंचाना दाखवून त्यांना भुलवत आहे. तसेच या “आदर्श सरपंचांना” पुरस्कार मिळविण्यासाठी मोठया प्रमाणात अर्थाजन होत असल्याचीही शिरुर तालुक्यात दबक्या आवाजात जोरदार चर्चा सुरु असुन आता शिरुर तालुक्यातील ह्या सरपंचाना मिळालेले हे ” आदर्श सरपंच ” पुरस्कार विकतचे का फुकटचे हे त्यांनाच ठाऊक.