युवकांनी व्यवसायात उतरणे गरजेचे: नाथाभाऊ शेवाळे

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): युवकांनी व्यवसायात उतरून व्यवसायात चिकाटी व सातत्य ठेवल्यास नक्कीच लाभ होतो त्यामुळे युवकांनी व्यवसायात उभारी घेऊन व्यवसायातून मिळालेल्या पैशाचा सदुपयोग करावा, असे प्रतिपादन जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी केले.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शरद टेमगिरे यांच्या क्लासिक टेलर्स या दुकानाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे बोलत होते. यावेळी शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, बुरुंजवाडीचे सरपंच नानासाहेब रुके, शिक्रापूरचे ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, माजी उपसरपंच नवनाथ सासवडे, राजेंद्र मांढरे, डॉ. रवींद्र टेमगिरे, उद्योजक शिवाजी मांढरे, धर्मा टेमगिरे, अंकुश घारे, प्रकाश चव्हाण, दर्शन टेमगिरे, अमोल काशीद यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये डावलले जात असल्याची बाब दुर्दैवी असून स्थानिकांच्या नोकरीबाबत विधिमंडळात बदल झाला पाहिजे त्यामुळे स्थानिकांना नक्कीच लाभ होईल, असे देखील जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रवींद्र टेमगिरे यांनी केले तर बुरुंजवाडीचे सरपंच नानासाहेब रुके यांनी आभार मानले.