मुलांच्या गुरुदक्षिणेने गहिवरले वसतिगृह चालक

शिरूर तालुका

कासारी फाटा येथे शिवाजी शिंदे करतात वीस मुलांचा सांभाळ

शिक्रापूर: गुरु म्हणजे आपल्याला कोणत्याही क्षेत्रात चांगली दिशा देणारी व्यक्ती, गुरुपौर्णिमा हा गुरुंची कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस मात्र याच दिवशी भटक्या विमुक्त व पालकत्व हरवलेल्या मुलांकडून मिळालेल्या गुरु दक्षिणेने वसतिगृह चालक गहिरवले आहे.

कासारी फाटा (ता. शिरुर) येथे शिवाजी शिंदे यांनी गुरुकुल वसतिगृह सुरु केले असून सदर ठिकाणी ते भटक्या विमुक्तांसह पालकत्व हरवलेल्या मुलांचा सांभाळ करत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य करत आहेत. सध्या येथे बीड, भिगवण, यवत, आष्टी, अहमदनगर सह आदी ठिकाणचे २० विद्यार्थी वास्तव्य करत शिक्षण घेत आहेत. शिवाजी शिंदे हे मुळचे भिगवण येथील रहिवाशी असून सध्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कंपनीमध्ये नोकरी करुन त्याचे हे अनोखे कार्य करत आहेत.

unique international school
unique international school

सर्व मुले शिक्षण घेत असल्याने त्यांना गुरुपोर्णिमेचे महत्व समजत असल्याने सर्व मुलांनी शेजारील झाडांची फुले तोडून आणत त्यापासून पुष्पगुच्छ बनवून आपला सांभाळ करत आपल्याला योग्य दिशा देणारे गुरु असलेले गुरुकुल वसतिगृहाचे संचालक शिवाजी शिंदे यांना देत त्यांचे दर्शन घेतले. मात्र यावेळी मुलांनी अचानक दिलेल्या गुरुदक्षिणेमुळे शिवाजी शिंदे हे देखील गहिवरुन गेले, तर यावेळी बोलताना मुलांना योग्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत असताना मुलांना योग्य ज्ञान मिळू लागले असल्याचे समाधान वाटत असल्याचे शिवाजी शिंदे यांनी सांगितले.