…अन् गायक अतुल यांनी दुचाकीवर शिरुर गाठले

इतर

शिरुर (तेजस फडके): तुम्ही यशाची कितीही शिखरे पादाक्रांत करा, मात्र आपल्या शिक्षकांना विसरु नका हे दाखवून दिले देशातील प्रसिध्द गीतकार, संगीतकार व पार्श्र्वगायक अतुल यांनी.

प्रसिद्ध गीतकार, संगीतकार,गायक अशी ओळख असलेली जोडी अर्थात अजय अतुल. फॅन्ड्री असो सैराट की चंद्रमुखी यातील प्रत्येक गाण्यावर ताल धरायला लावणारी गाणी कोणाची तर याचे एकच उत्तर येईल ते म्हणजे अजय अतुल यांचेच. संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात आपल्या कलेने वेगळे स्थान निर्माण करुन संगीत क्षेत्रात या जोडीने आपला वेगळा दबदबा निर्माण केला आहे. वेगळे स्थान निर्माण केले.

भावगीते, भक्तिगीते की युगुलगीते असो, या अजय अतुल यांच्या नावावर असलेल्या गीतावर तल्लीन न होणारा मात्र विरळाच. मात्र ही जोडी यशाच्या शिखरावर असून देखील आपण मात्र जमिनीवरच असल्याचे दाखवून देत आहे. संगीतकार व पार्श्र्वगायक अजय अतुल यांचे बालपण शिरुर मध्ये गेले आहे.

तसेच प्राथमिक शिक्षण देखील त्यांनी शिरुर येथील विद्याधाम प्रशाला येथे घेतले आहे. त्यांच्या जडणघडणीत मोठा वाटा असलेल्या शिरुर ला मात्र ते कधीच विसरत नाहीत. सोमवार (दि.५ सप्टेंबर) हा शिक्षकदिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. आजच्या या दिवशी प्रत्येकजण आपल्या शिक्षकाप्रती आदरभाव व्यक्त करत असतो. हेच औचित्य साधून अतुल यांनी दुचाकीवर शिरुर गाठले. त्यांनी हुडको वसाहत येथे राहणारे शिक्षक व्ही.डी. कुलकर्णी सर यांची भेट घेतली. यावेळी नतमस्तक होऊन गुरुंचे आशीर्वाद घेतले.

अचानकपणे दारात अतुल यांना पाहून शिक्षक देखील भारावून घेतली. यावेळी अतुल यांनी कुटुंबीयांची आवर्जून भेट घेत आस्थेने चौकशी केली. त्याकाळी शेजारी राहणाऱ्या सर्वांची,मित्रांची देखील विचारपूस केली. मी पुन्हा आवर्जून नक्की येईल, असे आश्वासन दिले.

जमलेल्या आबालवृद्धांचे त्यांनी पुन्हा आशीर्वाद घेतले अन् दुचाकीवर मार्गस्थ झाले. अचानकपणे दुचाकीवर आलेल्या अतुल यांना पाहून हुडको वसाहतीत सारेच अचंबित झाले, तर भेटलेले प्रत्येकजण भारावून गेला होता. माणूस यशाची कितीही शिखरे पादाक्रांत करत असला तरी आपल्याला शिक्षण देणाऱ्या गुरुंना विसरुच शकत नाही. अहंकार सोडून विनम्रता किती महत्त्वाची असते हे शिक्षकदिनी गायक अतुल यांनी दाखवून दिले आहे.