shikrapur traffic

शिक्रापूरमध्ये वाहतूककोंडी; पाच मिनिटाच्या अंतराला एक तास…

इतर

सलग तीन दिवस करावा लागतोय वाहतूककोंडीचा सामना

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पुणे-नगर रस्ता वाहतूककोंडीने नेहमीच चर्चेत येत असणारा रस्ता असून मागील काही महिन्यांमध्ये या रस्त्याची वाहतूक कोंडीची ओळख पुसली जात असताना आता पुन्हा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. शिक्रापूरसह परिसरातील नागरिक व वाहनचालक या वाहतूककोंडीने त्रस्त झाले आहेत.

शिक्रापूर येथील मुख्य चौक तसेच पुणे नगर रस्ता वाहतूककोंडी मुळे संपूर्ण राज्यात गाजलेला रस्ता आहे, यापूर्वी अनेकदा सदर रस्त्याचा विषय विधानसभेत देखील गाजला गेला. कित्येकदा पुणे नगर रस्ता रुंदीकरणा बाबत देखील चर्चा झाल्या, पुणे नगर रस्त्यावर होणाऱ्या वाहतूककोंडीत कित्येकदा आमदार, खासदार व मंत्री देखील अडकले गेलेले आहेत. अनेक वर्षांपासून पुणे-नगर रस्त्याच्या वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लागलेला नाही, सध्या रक्षाबंधन तसेच स्वातंत्र्यदिन, शनिवार, रविवारच्या लागोपाट सुट्ट्या असल्यामुळे अनेक कामगार, नागरिक बाहेरगावी चाललेले असल्याचे चित्र आहे, तसेच सध्या पावसाच्या दिवसांमुळे काही ठिकाणी खड्डे व पाणी साचल्यामुळे देखील सध्या वाहतूक कोंडी वाढत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांमुळे देखील पुणे नगर रस्त्यावर होणाऱ्या वाहतूककोंडीत अजूनही भर पडत आहे.

पुणे नगर रस्त्यावरील शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव भिमा, रांजणगाव, कोंढापुरी, लोणीकंद, वाघोली येथे मुख्य चौकात वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागत आहेत. वाहनांच्या तिन ते चार किलोमीटर पर्यंत रांगा लागत असल्यामुळे वाहतूककोंडी विस्कळीत होत आहे. या रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद देवरे, गणेश शेडे, राकेश मळेकर, ज्ञानदेव गोरे, सहदेव ठुबे, जितेंद्र मांडगे, अंबादास थोरे, राजेंद्र घनवट यांसह वाहतूक विभागाचे पोलिस कर्मचारी वाहतूक कोंडी सोडविण्याचे प्रयत्न करत असताना देखील वाहतूककोंडी सोडविणे पोलिसांना मुश्कील झाले आहे. मात्र वाहनांची संख्या जास्त आणि रस्ता अरुंद असल्यामुळे वाहनांच्या रांगा चार ते पाच किलोमीटर पर्यंत पोहचत आहेत, परंतु पुणे नगर रस्त्यावरील स्थानिक नागरिक, ग्रामस्थ व व्यापारी यांना सदर वाहतूककोंडीचा फटका बसत आहे. त्यामुळे पुणे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटून स्थानिकांना मोकळा श्वास घेता यावा अशी मागणी परिसरातील नागरिक व ग्रामस्थ करत आहे.

पाच मिनिटाच्या अंतराला एक तास…
शिक्रापूर येथील पुणे नगर रस्त्यावर होत असलेल्या वाहतूककोंडी मुळे एक किलोमीटर अंतरावरील अंतरावर प्रवास करण्यासाठी पाच मिनिटे लागत असताना सध्या होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे पाच मिनिटाचे अंतर प्रवास करण्यासाठी एक तास वेळ लागत असल्याचे दिसून येत आहेत.

रुग्णवाहिकांना देखील वाहतूककोंडीचा फटका…
पुणे नगर रस्त्यावर होणाऱ्या वाहतूककोडी मध्ये अनेक वाहने अडकत असताना ठिकठिकाणच्या रुग्णालयातून पुणे येथे उपचारासाठी रुग्ण घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिका सुद्धा या वाहतूककोंडीत अडकत आहेत, त्यामुळे त्या रुग्नावाहीकांच्या सायरनच्या आवाजाचा त्रास नागरिकांना होत असताना रुग्णवाहिकांना देखील वाहतूककोंडीचा फटका बसत आहे व रुग्णांना जीव गमविण्याची वेळ येत आहे.

कासारी फाटा येथील बायपास सोयीस्कर…
पुणे नगर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना पुणे कडे जाण्यासाठी कासारी फाटा येथून तळेगाव ढमढेरे मार्गे सणसवाडी, अहमदनगर कडे जाणाऱ्या वाहनांसाठी सणसवाडी तळेगाव मार्गे कासारी फाटा हून अहमदनगर तसेच चाकणला जाण्यासाठी देखील सदर रस्ता सोयीस्कर होत आहे. मात्र, वाहनचालकांना माहिती नसल्याने येथील रस्ताच वापर होत नाही. मात्र हा रस्ता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खूप सोयीस्कर आहे.