शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील नावाजलेल्या ‘सेंट जोसेफ’ या शाळेत रात्रीच्या वेळेस डिजेच्या तालावर मद्यधुंद अवस्थेत डान्स करणे शिक्षकांना चांगलेच भोवले असुन शाळेतील काही शिक्षकांसह तब्बल १७ जणांवर शिरुर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अशा मद्यपी शिक्षकांचा शाळेतील विद्यार्थ्यांनी नक्की काय आदर्श घ्यायचा अशी सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. जर शिक्षकच शाळेत असे वागत असतील तर विद्यार्थ्यांवर ते काय संस्कार करणार’ असा सवाल उपस्थित होत असुन धांगडधिंगा घालणाऱ्या या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमन सखाराम साळवे (वय ४४) रा.बगाड रस्ता, रामलिंग, शिरुर यांनी शिरुर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. सुरेश चौगुले, अभिषेक जाधव व इतर १५ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक २० जुन २०२४ रोजी सुमन साळवे यांच्या घराच्या शेजारी असणारी सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कुल बगाड रस्ता, रामलिंग, शिरुर येथे रात्री १०:३० च्या सुमारास डीजे वाजण्याचा कर्णकर्कश आवाज येत होता. साळवे यांची मुले यु.पी.एस.सीचा अभ्यास करत असल्याने त्यांनी शाळेचे गेटवर जाऊन वॉचमन (नाव माहित नाही) कडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी शाळेच्या आतमध्ये कोणाला तरी फोन केला. त्यावेळी वॉचमनने सांगितले की, ‘तुम्हालाच आत मध्ये बोलविले आहे’.
त्यामुळे सुमन साळवे व त्यांचा मुलगा असे दोघेही शाळेच्या आत मध्ये गेले. तेव्हा शाळेतील काही पुरुष आणि महिला शिक्षक असे १० ते १५ जण दारूच्या नशेत असल्याचे दिसून आले. म्हणून सुमन साळवे प्रिन्सिपल मॅडमला दाखवण्यासाठी या त्यांचा व्हिडिओ काढू लागल्या. त्यावेळी प्रिन्सिपल ज्ञानसी पायस व इतर दोन महिला तिथे आल्या. त्यावेळी शिक्षक आणि शिक्षिकांचा मद्यधुंद अवस्थेत डिजेच्या तालावर डान्स चालु होता.
यावेळी साळवे या ज्ञानसी पायस यांना डिजेचा आवाज कमी करा अश्या म्हणाल्या. त्यानंतर ज्ञानसी पायस यांनी साळवे यांना ‘तु कोण’ असे म्हणतं इतर लोकांना म्हणाल्या की, ‘हिला धरुन ठेवा आणि पोलिसांना बोलवा’ हे सगळे दारुच्या नशेत होते. त्यावेळी सुमन साळवे तिथुन बाहेर निघाल्या. तेव्हा बाहेर जात असताना मॅडम (पूर्ण नाव माहित नाही) यांनी साळवे यांना लाथ मारली. त्यांचा मोबाईल काढून घेतला व त्यांचा मुलगा जीवन सखाराम साळवे यांस सुरेश चौगले ( पूर्ण नाव माहित नाही) याने तसेच त्याच्या साथीदारांनी धक्काबुक्की केली. अंधार असल्यामुळे किती व्यक्ती होत्या हे त्यांना दिसले नाही.
त्यानंतर प्रिन्सिपल ज्ञानसी पायस यांनी सुमन साळवे व त्यांच्यामुलांच्या विरुद्ध शिरूर पोलीस स्टेशन येथे खोटी तक्रार दिली. त्यानंतर सुरेश चौगुले व अभिषेक जाधव यांनी रस्त्याने येत-जात असताना शिवीगाळ करुन सुमन साळवे यांचा मुलगा जीवण याला ‘खल्लास’ करुन टाकतो अशी धमकी देत तुम्ही आमचे काही वाकडे करु शकत नाही ‘असे म्हणून त्रास दिला. त्यासंदर्भात दि २२ऑगस्ट २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले हे करत आहेत.
शिरुर येथील खाजगी शाळांवर नियंत्रण ठेवणं गरजेचे…
नुकतीच ‘बदलापूर’ ची दुर्देवी घटना घडली असतानाच असा प्रकार शांत-संयमी असणाऱ्या शिरुर शहरात घडला. गटशिक्षणाधिकारी शिरुर यांनी गांभीर्यपुर्वक दखल घेऊन संबंधित शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच या खाजगी शाळांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. शिरुर शहरातील रामलिंग येथील ‘सेंट जोसेफ’ हि शाळा शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यात खुप मोठया राजकीय प्रस्थ असलेल्या पुढाऱ्याची असल्याने या शाळेत कायमच मद्यधुंद शिक्षकांच्या पार्ट्या चालु असतात. परंतु या बड्या राजकीय पुढाऱ्यामुळे या शाळेतील शिक्षकांना अभय मिळत असल्याचीही सध्या दबक्या आवाजात रामलिंग परीसरात चर्चा सुरु आहे.
शिरुर येथुन अचानक आई व मुलगा बेपत्ता, पोलिस स्टेशनमध्ये हरविल्याची तक्रार दाखल; पतीचे गंभीर आरोप
शिरुर; अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ निलेश वाळुंज यांचे लाक्षणिक उपोषण आंदोलन
शिरुर तालुक्यातील ढोकसांगवी-परीटवाटी रस्त्यावर कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू
Video; पुणे-नगर रस्त्यावर फलके मळा येथे दोन दुचाकीच्या भीषण अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी