शिरुर तालुक्यात अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांची चिंता वाढली

मुख्य बातम्या शिरूर तालुका

कान्हूर मेसाई (सुनील जिते) शिरुर तालुक्यात आज मंगळवार (दि 9) रोजी दुपारच्या सुमारास हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या अवकाळी पावसाला सुरूवात झाली. नंतर मात्र सायंकाळच्या सुमारास काही ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला दिसून आला. तसेच हवेमध्ये कमालीचा गारठा वाढून धुकेही जमा झाले. आज दिवसभर ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, धुके व हवेतील गारवा याचा शिरुर तालुक्यातील पिकांसह फळबागांना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

 

सध्या थंडीच्या कडाक्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होणार असून धुके व पावसामुळे पिकांवर मावा, तुडतुडे, बुरशी सारख्या रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची चिन्हे आहेत. मागील एक महिन्यापूर्वी झालेल्या गारपीटीसह मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यातून कुठेतरी शेतकरी कसाबसा सावरत असताना आता पुन्हा एकदा तशीच स्थिती निर्माण झालेली आहे. कांदा,ज्वारी, गहू, हरभरा, टोमॅटो,खरबूज आदी पिकांसह डाळिंब, द्राक्षे यांसारख्या फळबागांवर या खराब हवामानाचा परिणाम होऊन त्यांच्या उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

 

तसेच जिल्ह्याच्या अनेक भागातही हलक्या ते मध्यम स्वरुपात अवकाळी पाऊस असल्याचे दिसून आले. रासायनिक खत, औषधे, मजुरी, शेती मशागत यांचा प्रचंड वाढलेला खर्च आणि त्यात नैसर्गिक अवकाळी संकटे यामुळे शेतकरी मात्र पुरता हवालदिल झाला आहे. त्यामुळे बळीराजाचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची परस्थिती निर्माण झाली असताना सरकारला मात्र याचे काहीच गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी गारपीटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले पण अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई आलेली नाही.