मुंबई: महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक व उच्च शिक्षण परीक्षांची तयारी करण्यासाठी शासन सीमा भागात प्रशिक्षण केंद्र निर्माण करणार का? असा सवाल भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी सभागृहात उपस्थित केला.
सभागृहात सदस्य निरंजन डावखरे यांनी सीमा भागाबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी या चर्चेत सहभाग घेत आ. दरेकर म्हणाले कि, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्याना तलाठी भरतीत शासनाने संधी उपलब्ध करून दिलीय त्याप्रमाणे इतर पदांच्या भरतीबाबत शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना संधी प्रदान करणार का? महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारी करण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात प्रशिक्षण केंद्र तसेच कौशल्य विकास केंद्र निर्माण करण्याबाबत शासन कार्यवाही करणार का? मविआ सरकारने महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागाची गरज लक्षात घेऊन मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाकडून नवीन सरकारी महाविद्यालये स्थापन करण्याची घोषणा केली होती.
तत्कालीन कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. मात्र पुढे काही झाले नाही. महायुतीचे सरकार महाविद्यालय उघडण्याबाबत तातडीने पावले उचलणार का? असे तीन प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केले. यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हो असे सकारात्मक उत्तर दिले.