शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील फाकटे गावात शेतात पाचट जाळल्याने शेजाऱ्याच्या एक एकर ऊस पिकास आग लागून सुमारे ५०,००० रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात बाळासाहेब धोंडीबा हिंगे आणि त्यांचा मुलगा सचिन बाळासाहेब हिंगे (रा. अवसरी बुद्रुक, ता. आंबेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सुमन पंढरीनाथ काळे (वय ५६, रा. फाकटे, ता. शिरूर) यांनी दिलेल्या माहितीवरून, (दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्या आपल्या शेतात (गट नंबर ९२/११) ऊसाला पाणी देत असताना त्यांना शेजारील शेतात धुर दिसल्याने त्या घटनास्थळी गेल्या. तेथे आरोपी बाळासाहेब हिंगे आणि त्यांचा मुलगा सचिन यांनी त्यांच्या शेतातील उसाचे पाचट जाळले होते. यामुळे त्यांच्या (फिर्यादीच्या) शेतात (गट नंबर ९३/१३) लागलेल्या एक एकर लहान ऊस पिकाला आग लागली. यासोबतच पाण्याची पाइपलाइनही आगीत जळाली.
घटनास्थळी योगेश शिंदे, महादू शिंदे, आणि संदीप हुंडारे हे साक्षीदार उपस्थित होते. फिर्यादीच्या मते, आरोपींना आग लागल्यास शेजारील ऊसाला आणि मालमत्तेला धोका होऊ शकतो याची पूर्ण जाणीव होती, तरीही त्यांनी जाणीवपूर्वक पाचट पेटवून दिले. परिणामी फिर्यादीचे सुमारे ५०,००० रुपयांचे नुकसान झाले. शिरूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हवा आगलावे हे करत आहेत.