कष्ट अन् जिद्दीच्या जाेरावर समीक्षा शेलारची ग्रंथपाल पदाला गवसणी

महाराष्ट्र

कोरेगाव: नाशिक येथील महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास आयुक्तालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या सरळ सेवा भरतीतील ग्रंथपाल पदाच्या लेखी परीक्षेत म्हसवे (ता. सातारा) येथील समीक्षा संदीप शेलार हिने एसईबीसी (सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वर्ग) प्रवर्गातून महिलांत प्रथम क्रमांक पटकावला.

आदिवासी विकास आयुक्तालयाच्या वतीने पाच ऑक्टोबर २०२४ ला एकूण १७ पदनामांसाठी ६११ रिक्त पदभरतीसाठी सरळ सेवा जाहिरात काढली होती. त्यातील ग्रंथपाल पदासाठी समीक्षा शेलार हिने लेखी परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात समीक्षा शेलार हिने एसईबीसी प्रवर्गातून महिलांत प्रथम क्रमांक मिळवला. तिची ग्रंथपालपदी निवड झाली.

सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील समीक्षाचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये, तर सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या माध्यमातून तिने नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा ग्रंथपाल हा डिप्लोमा पूर्ण केला आहे. समीक्षाने या यशाचे श्रेय आई मीना, वडील संदीप, कुटुंबीय, शिक्षकांना दिले. या यशाबद्दल व निवडीबद्दल अभिनंदन होत आहे.