रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एका नव्या कंपनीने परवानगीपेक्षा जास्त प्रमाणात अवैधरित्या उत्खनन केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी केला असून, या प्रकरणी पंचनाम्यात झालेल्या अनियमिततेवरुन महसूल प्रशासनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याशिवाय, संबंधित उत्खनन करणाऱ्या ठेकेदाराने भोरडे यांना फोनवरुन धमकी दिल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात (Ranjangaon MIDC Police Station) गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, औद्योगिक वसाहतीत सुरु असलेल्या नवीन कंपनीच्या उभारणीसाठी महसूल प्रशासनाकडून जमीन सपाटीकरणाची परवानगी घेण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उत्खनन झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत भोरडे यांनी ३० जुलै २०२५ रोजी शिरुर तहसील कार्यालयात याबाबत तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीनंतर महसुल प्रशासनाने ११ ऑगस्ट २०२५ रोजी पंचनामा केला. मात्र, नियमानुसार पंचनामा करताना तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील आदी स्थानिक अधिकाऱ्यांना उपस्थित राहणे अपेक्षित असताना, मंडल अधिकारी सतीश पंचरास यांनी एकट्यानेच पंचनामा करुन अहवाल तहसील कार्यालयात सादर केला. त्यामुळे पंचनाम्याची वैधता आणि पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, तक्रार दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी १ ऑगस्ट २०२५ रोजी संबंधित ठेकेदाराने अशोक भोरडे यांना फोन करुन “ ते आमचे काम आहे, तेथे तुम्ही हस्तक्षेप करु नका” अशी धमकी दिली. या प्रकरणी भोरडे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे संबधित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असुन याबाबत पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.
अशोक भोरडे यांच्या तक्रारीवरून भुमाफिया राहुल करपे याच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल
मुंबई: शिरुरचे आरटीआय कार्यकर्ते अशोक भोरडे यांचे विविध मागण्यासाठी आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरु
शिरुर; सामाजिक कार्यकर्त्यांची सुरक्षा ऐरणीवर अशोक भोरडे यांच्या जिवितास धोका पोहचवण्याचा कट…?