शिरुर; रामलिंग येथे श्रीमंत सरदार घराण्यांच्या हस्ते नवदुर्गा पुरस्काराने महिलांचा गौरव

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) नवरात्र म्हणजे फक्त देवीची पूजा नाही तर महिलांच्या सामर्थ्याचा गौरव करण्याची संधी आहे. स्व. गणेश गौतम घावटे पाटील युवा मंच तसेच रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात अनोखी कामगिरी करणाऱ्या महिलांचा “नवदुर्गा पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला.

या सोहळ्याला ऐतिहासिक छटा लाभली. सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज कुणाल मालुसरे, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज संग्रामसिंह मोहिते पाटील, वीरमाता धाराऊ यांचे वंशज अमित गाडे पाटील व नागपूरकर भोसले पाटील वंशज सचिन भोसले पाटील यांच्या हस्ते शिरुरच्या मातृशक्तीला छत्रपतींच्या शूर सरदार घराण्यांची थेट साथ मिळाली, हे या सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य ठरले.

यावेळी गृहिणी क्षेत्रात सुरेखा दसगुडे, शिक्षणात राजश्री मोटे, समाजकारणात मीना गवारे, धार्मिक कार्यात वर्षा नाईक, वैद्यकीय सेवेत डॉ. शिल्पा बढे, औद्योगिक क्षेत्रात रेखा पवार, पोलिस सेवेत शोभा ससे, राजकारणात रोहिणी बनकर आणि पत्रकारितेत मनीषा राजगुरु या ‘नवरत्नांना नवदुर्गा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

नवरात्रात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये महिलांच्या कर्तृत्वाची झलक दिसली. “होम मिनिस्टर” या मानाच्या पैठणीवर स्नेहल कर्डिलेने झेंडा रोवला, तर पूजा दौंडकर आणि कविता गोरे यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. डान्स स्पर्धेत सप्तमी घावटे पाटील, भावेश सांगळे, आनवी लंगडे व सानवी गोरे यांच्या कलाकृतींनी प्रेक्षकांची मने जिंकली.

त्याचप्रमाणे “महिलांचे कायदे” या विषयावर कल्याणी सखी ग्रुप आणि अ‍ॅड भाग्यश्री बोरा यांनी सादर केलेल्या पथनाट्याने समाजासमोर ठळकपणे महिलांच्या हक्कांची जाणीव करुन दिली. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक राणी कर्डिले, सूत्रसंचालन अर्जुन निचित तर आभार पत्रकार तेजस फडके यांनी मानले.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण जाहीर

शिरुर तालुक्यात मनरेगा योजनेत गैरव्यवहाराचा आरोप; उपोषणाचा इशारा

Video; शिरुर तालुक्यात बिबट–मानव संघर्ष टाळण्यासाठी १२ ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अलर्ट सिस्टीम

शिरूर! इन्स्टाग्राम फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्याच्या रागातून युवकावर जीवघेणा हल्ला; पाहा Video