शिरुर तालुक्यात मनरेगा योजनेत गैरव्यवहाराचा आरोप; उपोषणाचा इशारा

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) भांबर्डे (ता. शिरुर) येथील मच्छिंद्र बापूराव पवार यांनी मनरेगा योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबत त्यांनी ग्रामविकास अधिकारी तसेच सरपंच यांना लेखी निवेदन दिले आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करुन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा उद्या २ ऑक्टोबर २०२५ रोजी उपोषण करण्याचा इशारा पवार यांनी दिला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण…? 

भांबर्डे गावातील सुरेश विश्वनाथ देशमुख आणि प्रदीप सुरेश देशमुख यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MNREGA) अंतर्गत गट नं. ६१७ मध्ये विहीर खोदली आहे. या विहिरीसाठी वर्क कोड मंजुर झाला असला तरी प्रत्यक्षात हे काम गट नं ४७ मध्ये मंजुर असल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे. संबंधित व्यक्तींना या जमिनीशी कोणताही संबंध नसतानाही, मशीनद्वारे (यंत्राद्वारे) काम करून शासनाची फसवणूक करण्यात आली असा आरोप करण्यात आला आहे. सदर विहिरीवर आत्तापर्यंत ८ मस्टर काढले गेले असुन, यामध्येही शंका उपस्थित करण्यात आली आहे.

कारवाई न झाल्यास उपोषण…?

या प्रकरणाची तातडीने चौकशी करुन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच गैरकायदेशीररीत्या काढलेले मस्टर रद्द करावे. अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा मच्छिंद्र बापूराव पवार यांनी दिला आहे. तसेच शिरुरचे गटविकास अधिकारी यांनाही याबाबत पवार यांनी लेखी निवेदन दिले आहे.

त्यामुळे भांबर्डे गावातील ग्रामस्थ व संबंधित अधिकाऱ्यांमध्ये या प्रकरणामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. मनरेगा योजनेतील निधीचा दुरुपयोग व सरकारी यंत्रणेला फसवण्याच्या आरोपामुळे ग्रामविकास विभागाकडून कारवाईची अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

Video; शिरुर तालुक्यात बिबट–मानव संघर्ष टाळण्यासाठी १२ ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अलर्ट सिस्टीम

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण जाहीर

शिरुर तालुक्यात कंपनीतुन तब्बल १६ लाखांची कॉपर ट्यूब चोरी; औद्योगिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह…?