शिरुर तालुक्यात रोहित्र चोरी सुरुच; प्रशासन झोपेत, शेतकरी उघड्यावर!

शिरूर तालुका

शिरुर (नितीन थोरात): शिरुर तालुक्यातील आमदाबाद परिसरात पुन्हा एकदा वीज रोहित्र चोरीचा प्रकार घडला असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे चोरट्यांना मोकळे रान मिळाले आहे. काही दिवसांपुर्वी याच गावात तीन रोहित्र फोडले गेले होते. तरीही एकही आरोपी जेरबंद न झाल्याने चोरट्यांचे धाडस वाढतच आहे.

तालुक्यात रोहित्र चोरी संघटित टोळीमार्फत सुरु असलेले खुले आव्हान बनले आहे. ऐन शेतीच्या हंगामात वीज तोडली जात असल्याने विहिरी, बोअरवेल,ठिबक सिंचन व्यवस्था ठप्प पडली असून शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे.

शिरुर तालुक्यात सध्या भंगाराची दुकाने वाढली असुन त्यावर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. सध्या तांब्याला भाव वाढल्याने चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे असे चोरीचे सामान खरेदी करणाऱ्या भंगार दुकानदारांवर प्रशासनाने कारवाई करावी हि मागणी जोर धरु लागली आहे.

त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांचे रोहित्र चोरीमुळे अजूनच आर्थिक नुकसान होतं आहे. मात्र हातावर हात धरुन बसलेली यंत्रणा

“रोहित्र चोरांचा कायमचा बंदोबस्त करणार की नाही…?” “शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार?” असे सवाल आता गावोगावचे शेतकरी विचारत आहेत.

त्यासाठीच पोलिसांनी तात्काळ विशेष पथक नेमून रात्रगस्त वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.