शिरुर! राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आदर्श माता व आदर्श पत्रकार पुरस्काराने मान्यवरांचा गौरव

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (किरण शेलार-पिंगळे): “राजमाता जिजाऊ या केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या पहिल्या गुरु होत्या. त्यांच्या विचारांमधूनच स्वधर्म, स्वराज्य आणि स्वाभिमानाची बीजे शिवरायांच्या मनात रोवली गेली. तसेच स्वामी विवेकानंद यांनी आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती आणि जीवनमूल्यांची शिकवण समाजाला दिली. या दोन्ही महामानवांचे कार्य प्रेरणादायी असून विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार प्रत्यक्ष जीवनात आत्मसात करावेत,” असे आवाहन रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले यांनी केले.

रांजणगाव गणपती येथील मंगलमुर्ती विद्याधाम विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने कौसल्या कांतीलाल शिंदे तसेच उज्ज्वला सुदाम कुटे यांना आदर्श माता पुरस्काराने, तर ज्येष्ठ पत्रकार सतीश आनंदराव डोंगरे यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगलमूर्ती विद्याधामचे मुख्याध्यापक सुनील थोरात होते. यावेळी रांजणगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप कुटे, अश्विनी नरवडे व सुवर्णा चिपाडे हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.

यावेळी बोलताना राणी कर्डीले पुढे म्हणाल्या की, “राजमाता जिजाऊ यांनी अत्यंत कठीण काळात धैर्य, शहाणपण आणि नेतृत्वगुणांचे दर्शन घडवले. अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा त्यांनी शिवरायांना दिली. त्यांच्या संस्कारांमुळेच छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श, प्रजाहितदक्ष आणि लोककल्याणकारी राजा घडले. राजमाता जिजाऊ या मातृत्व, राष्ट्रभक्ती आणि संस्कारांचे तेजस्वी प्रतीक आहेत.” तसेच स्वामी विवेकानंद यांनी स्वतःवर विश्वास ठेवून समाज व राष्ट्रासाठी कार्य करण्याची शिकवण दिल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी संदीप कुटे व पत्रकार तेजस फडके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माहेश्वरी माने व स्मिता सुतार यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाळेचे पर्यवेक्षक सुभाष पाचकर यांनी मानले.