जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या

महाराष्ट्र राजकीय

मुंबई: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेतील गंभीर त्रुटी उघड केल्या असून, मतदारांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास ढासळत चालल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. शहरांमधील अत्यल्प मतदानाची टक्केवारी ही केवळ मतदार उदासीनतेचे नव्हे, तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरील अविश्वासाचे द्योतक असल्याचे मत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी ठाम मागणी करत नाना पटोले यांनी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे.

पत्रात नाना पटोले म्हणतात की, देशातील अनेक राज्यांनी जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी आणि निवडणूक वाद टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय घेतला आहे. मग महाराष्ट्रातच EVM चा हट्ट का आणि तो नेमका कोणाच्या फायद्यासाठी, असा प्रश्न आज मतदार विचारत आहेत.

महानगरपालिका निवडणुकांदरम्यान मतदार यादीतील घोळ, मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांना दोन-तीन तासांची वणवण, हजारो मतदारांना मतदान न करताच परत जावे लागणे, या घटना निवडणूक आयोगाच्या अकार्यक्षमतेचे गंभीर निदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले. ही परिस्थिती लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याचेही त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

अत्यंत गंभीर बाब म्हणजे पालिका निवडणुकांमध्ये VVPAT प्रणालीचा वापर करण्यात आला नाही, त्यामुळे मतदाराला आपल्या मतदानाची खात्री करून घेण्याचा अधिकार हिरावून घेण्यात आला. तसेच, मतदारांच्या बोटाला लावलेली शाई हात धुतल्यानंतर पुसली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या. या सर्व प्रकारांमुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, विश्वासार्हता आणि निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका या लोकशाहीचा कणा असून, या निवडणुकांबाबत संशय, अविश्वास आणि गैरव्यवस्थेचे वातावरण राहिल्यास त्याचे गंभीर परिणाम लोकशाहीच्या आरोग्यावर होतील. त्यामुळे जनभावनेचा आदर राखत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवरच घ्याव्यात, अशी ठाम भूमिका नाना पटोले यांनी आपल्या पत्रातून मांडली आहे.