कोल्हापूर: शहरातील शाहू मिल चौक ते कोटीतीर्थ मार्गावर शनिवारी दुपारी भरधाव चारचाकीने घातलेला थरार दोन निष्पाप जीवांच्या बळीवर थांबला. बेदरकार कारचालकाने सलग पाच दुचाकींना धडक दिल्याने वकील मुलीसह तिच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.या अपघातानंतर संतप्त जमावाने कारचालकाची धुलाई करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
या दुर्घटनेत दीपक सहदेव वंशे (62, रविवार पेठ) आणि अॅड. भाग्यश्री लक्ष्मण गवळी (30, कसबा बावडा) यांचा मृत्यू झाला. तर कैवल्य उदय नाईक (24) व धनंजय करजगार (44) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातप्रकरणी मयुरेश योगेश पाटील (20, राजारामपुरी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पहिल्या धडकेनंतर पलायन, अन् भीषण अपघात
राजारामपुरीत एका वाहनाला धडक दिल्यानंतर घाबरलेल्या मयुरेशने कार न थांबवता भरधाव वेगात शाहू मिल चौकाकडे धाव घेतली. पाठलाग होत असल्याच्या भीतीने त्याने वेग अधिक वाढवला. कोटीतीर्थकडून येणाऱ्या दुचाकींना समोरासमोर धडक देत कारने अक्षरशः फुटबॉलसारखे उडवले.
15 ते 20 फूट उडाले बाप-लेकी
वेग इतका प्रचंड होता की, दुचाकीवर असलेले दीपक वंशे आणि त्यांची मुलगी भाग्यश्री हे रस्त्याच्या कडेला असलेल्या कुंपणापलीकडे 15 ते 20 फूट उडून दगडावर आपटले. डोक्याला गंभीर दुखापत होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला.
कार उलटी करून जखमींना बाहेर काढले
अपघातानंतर कारखाली अडकलेल्या जखमींना वाचवण्यासाठी नागरिकांनी चारचाकी उलटी केली. घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत चालकाला ताब्यात घेतले.
पोलिसांचा फौजफाटा; चौकशी सुरू
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी अपघाताला चालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे सांगत कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.
परिसरात शोककळा
महापालिकेच्या आरोग्य विभागातून निवृत्त झालेले दीपक वंशे आणि त्यांची होतकरू वकील मुलगी भाग्यश्री यांच्या अकाली निधनाने रविवार पेठ व कसबा बावडा परिसरात शोककळा पसरली आहे. नातेवाईकांचा आक्रोश काळजाला चिरणारा होता.