विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला; विक्रम पांचाळ ठार, चार आरोपींना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी

क्राईम महाराष्ट्र

लातूर: लातूर शहरात विद्यार्थ्यांमधील वादातून झालेल्या भीषण चाकूहल्ल्यात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अटक केलेल्या चारही आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मृत विद्यार्थ्याचे नाव विक्रम नारायण पांचाळ (वय २१, रा. कुंभारवाडी, ता. रेणापूर) असे आहे. दुचाकीच्या नुकसानीच्या भरपाईच्या कारणावरून सोमवारी दुपारी फिर्यादी व आरोपी यांच्यात वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून आरोपींनी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास वसतिगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ फिर्यादी व त्याच्या मित्रांना गाठले.

या हल्ल्यात केदार महादेव क्षीरसागर (वय १९), श्रीधर तानाजी जाधव (वय २४, दोघेही रा. शिवली, ता. औसा), प्रणव अप्पाराव उदगिरे (वय २०, रा. नळेगाव, ता. चाकूर) आणि सुजल जेजेराव दिंडे (वय १९, रा. दिंडेवाडी, ता. कंधार, जि. नांदेड) यांनी संगनमत करून लाकडी काठ्यांनी मारहाण केली. त्यानंतर श्रीधर जाधव याने चाकूने आदित्य सगरे, सुजल मरे आणि शंतनू परांडे यांच्यावर सपासप वार केले.

दरम्यान, विक्रम पांचाळ याच्या छातीवर व शरीरावर गंभीर वार करण्यात आले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्याचा प्रतिकार करणाऱ्या इतर तिघा विद्यार्थ्यांनाही गंभीर दुखापत झाली आहे.या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), १०९(१), ५४ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अटकेनंतर चाकू जप्त

हल्ल्यानंतर चारही आरोपी पसार झाले होते. मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई करत तासाभरात त्यांना अटक केली. आरोपींकडून वापरलेला चाकू जप्त करण्यात आला असून त्यांना मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले.

मुख्य आरोपीवर आधीच गुन्हा

अटकेत असलेला आरोपी श्रीधर तानाजी जाधव याच्याविरुद्ध २०२५ मध्ये पुण्यातील भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तो त्या प्रकरणात जामिनावर बाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.डीवायएसपी समीरसिंह साळवे यांनी सांगितले की, आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.या घटनेमुळे लातूर शहरात एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.