बीड: बीड जिल्हा पोलिस दल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. काही मनमानी वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे दलाची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
यापूर्वी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या शासकीय निवासस्थानी एका कर्मचाऱ्याला गांजा ओढताना पकडण्यात आले होते. त्या घटनेची चर्चा अद्याप थंडावलेली नसतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खुद्द एसपींच्याच कॅबिनमध्ये एक कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत हजर झाल्याचे उघड झाले आहे.
दत्तात्रय भनंग असे संबंधित कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याच्यावर बीड शहर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भनंग याला लातूर येथे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. मात्र, त्याने प्रशिक्षणाला दांडी मारत बीडमध्येही कर्तव्यावर हजेरी लावली नाही.
अनेक दिवस गैरहजर राहिल्यानंतर तो अचानक कामावर परतला. वरिष्ठांनी त्याला प्रथम एसपींना भेटण्याचे आदेश दिले. मात्र, तो मद्यप्राशन करूनच कार्यालयात पोहोचल्याचे समोर आले आहे.
मद्यधुंद अवस्थेत तो थेट एसपींच्या कॅबिनमध्ये गेला. त्याचे वर्तन संशयास्पद वाटल्याने नवनीत काँवत यांनी तात्काळ वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले. जिल्हा रुग्णालयात करण्यात आलेल्या तपासणीत त्याचा अल्कोहोल अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
विशेष म्हणजे, यापूर्वी तत्कालीन पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनीही या कर्मचाऱ्याचे निलंबन केले होते. त्यामुळे त्याच्या वर्तनाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या सलग घटनांमुळे बीड पोलिस दलाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, वरिष्ठांकडून कडक कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.