crime

शिरुर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; गावठी बनावटीच्या पिस्तुलासह दोन जण ताब्यात

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील निमोणे गावात भरदिवसा गावठी पिस्तुलासह दोन जण कारमध्ये फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागेश्वर विद्यालयासमोर उभी असलेल्या कारची तपासणी करताच पोलिसांच्या हाती गावठी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतूस लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी समीर प्रकाश शेलार (वय २३) आणि संतोष गणपत दुर्गे (वय ३५), दोघेही (रा. निमोणे ता. शिरुर, जि. पुणे) या दोघांना ताब्यात घेत पोलिस हवालदार विशाल लक्ष्मण कोथळकर (वय ३६) यांच्या फिर्यादीवरुन शिरुर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि. १३ मार्च) रोजी सकाळी सुमारे ९:३० च्या सुमारास निमोणे गावच्या हद्दीत नागेश्वर विद्यालयासमोर संशयास्पदरीत्या उभी असलेल्या पांढऱ्या रंगाच्या फोर्ड फिगो (एम एच १२ एच एल ३११४) या चारचाकी गाडीत दोनजण पिस्तूल घेऊन फिरत असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर निमोणे बीटचे पोलिस उपनिरीक्षक गोविंद खटिंग तसेच पोलिस हवालदार विशाल कोथळकर यांनी कारमध्ये बसलेल्या दोन संशयितांची चौकशी करत झडती घेतली असता कारच्या हँडब्रेकखाली काळसर रंगाचे लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तुल मॅगझीनसह आणि KF 7.65 असा उल्लेख असलेले एक जिवंत काडतूस पोलिसांच्या हाती लागले.

या कारमध्ये समीर प्रकाश शेलार (वय २३) आणि संतोष गणपत दुर्गे (वय ३५), हे दोघे आढळून आले. कोणताही परवाना नसताना हे दोघे बेकायदेशीररित्या गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतूस बाळगून फिरत असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तुल, ५०० रुपये किमतीचे जिवंत काडतूस आणि सुमारे २ लाख रुपये किमतीची फोर्ड फिगो कार असा एकूण २ लाख ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दरम्यान, शाळेसमोरच कारमध्ये पिस्तुलासह संशयित फिरत असल्याने निमोणे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही आरोपी हे शस्त्र नेमक्या कोणत्या उद्देशाने घेऊन फिरत होते…? कोणावर हल्ला करण्याचा त्यांचा कट होता का…? की इतर कोणत्या गुन्हेगारी कारवायांसाठी हे शस्त्र वापरण्याचा बेत होता…? याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरु आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटिंग हे करत आहेत.

घोड धरणात अवैध वाळू उपसा; कारवाईच्या नावाखाली आर्थिक तडजोडींचा संशय…? 

शिरुर तालुक्यातील सिंचन साहित्य चोरी प्रकरणाला नवे वळण; आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न…? 

शिरूरमध्ये अवैध गोहत्या प्रकरणातील सराईत आरोपी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

न्हावरे येथे कांदा उत्पादकांचा आक्रोश मेळावा; भारत दिघोळे साधणार शेतकऱ्यांशी थेट संवाद