निमोणे गावच्या आदर्श महिला सरपंच जिजाबाई दुर्गे यांना दिल्लीत आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने पुरस्कार

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) राष्ट्रीय पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष देवा तांबे यांच्या संकल्पनेतून ५ जून रोजी दिल्ली येथे संस्थेचे मोठे अधिवेशन पार पडले. या समारंभात निमोणे गावच्या आदर्श सरपंच तथा पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिजाबाई सुरेश दुर्गे यांना समाजभूषण पुरस्काराने मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात आले.

दिल्ली येथील हिंदी भवन येथे आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थानच्या विद्यमाने राष्ट्रीय पर्यावरण दिवसाचे औचित्य साधुन अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. त्यात पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील निमोणे गावच्या आदर्श महिला सरपंच जिजाताई दुर्गे यांना शाल सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करुन त्यांचा सन्मान करण्यात आला.

दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशिय संस्थानच्या या विशेष समारंभाला महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून जवळपास चारशेच्यावर पदाधिकारी वर्ग उपस्थित होता. अत्यंत पर्यावरणपूरक वातावरणामध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील पंचायत समिती सदस्य कल्याणी लोखंडे, देवदैठणच्या माजी आदर्श सरपंच मंगल कौठाळे, राजापुरच्या विद्यमान सरपंच प्रतीक्षा मेंगवडे, आरोग्य खात्याच्या आशा गुंड, निवृत्त शिक्षिका सुजाता रासकर यांनाही आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशिय संस्था भारत या संस्थेच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर दिल्लीचे आयपीएस सनदी अधिकारी ए.एस.पी आनंद मिश्रा, आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था (भारत) चे राष्ट्रीय अध्यक्ष देवा तांबे, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ रागिणी चवरे, राष्ट्रीय संघटक गोविंद प्रजापती, संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिनेश उघडे, ठाणे जिल्हाध्यक्ष महबूबभाई पैठणकर, राज्य प्रसिद्धी विभागाचे संजय बोरगे, दिल्ली येथील मान्यवर डॉ. ओमप्रकाश प्रजापती, डॉ. मनोज तांबे हे सर्व प्रमुख मान्यवर उपस्थित होते.