चंद्रपूर: धर्म आणि भावनेच्या राजकारणात बहुजन-ओबीसी समाजाला अडकवून त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. तरुणांच्या हाताला रोजगार नाही, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या पुरेशा संधी नाहीत, शेतकरी आर्थिक संकटात आहे आणि ओबीसींच्या आरक्षणासह संविधानिक हक्कांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. त्यामुळे भावनिक राजकारणाला बळी न पडता बहुजन-ओबीसी समाजाने आपल्या हक्कांसाठी निर्णायक संघर्ष उभारला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
चंद्रपूर येथे आयोजित ओबीसी मंडल यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात वडेट्टीवार बोलत होते. भंडारा येथून सुरू झालेल्या या यात्रेदरम्यान ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर जनजागृती करण्यात आली. मंडल आयोगाच्या माध्यमातून मिळालेल्या आरक्षणाचे संरक्षण, जातनिहाय जनगणना, शिक्षणातील संधी, रोजगारातील प्रतिनिधित्व, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण तसेच सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या प्रश्नांवर यात्रेत विशेष भर देण्यात आला.
‘धर्म श्रद्धेचा विषय, राजकारणाचा नाही’
धर्म हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे. मात्र, धर्माच्या नावावर राजकारण करून जनतेच्या मूलभूत प्रश्नांना बगल देणे योग्य नाही. बेरोजगारी, महागाई, शिक्षणाचा वाढता खर्च, शेतकऱ्यांच्या समस्या, युवकांचा रोजगार आणि आरक्षण यांसारखे प्रश्न गंभीर आहेत. या प्रश्नांवर ठोस उत्तर देण्याऐवजी समाजाला भावनिक मुद्द्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्याला बहुजन समाजाने ठामपणे विरोध केला पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले.
बहुजन समाजाच्या हातात सत्ता, शिक्षण आणि आर्थिक सक्षमतेची साधने आली, तरच सामाजिक परिवर्तनाला खऱ्या अर्थाने गती मिळेल. मात्र, बहुजनांच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा होऊ नये, त्यांना आपल्या अधिकारांची जाणीव होऊ नये आणि त्यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारू नये, यासाठी भावनिक मुद्द्यांचा आधार घेतला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
जातनिहाय जनगणनेची मागणी
मंडल आयोगाने ओबीसी समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाची दखल घेत त्यांना प्रतिनिधित्वाचा मार्ग खुला केला. अनेक पिढ्यांपासून वंचित राहिलेल्या समाजघटकांना शिक्षण आणि नोकरीच्या संधी मिळवून देण्यात आरक्षणाची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे मंडल आयोग हा केवळ एका समाजाचा विषय नसून सामाजिक न्यायाच्या लढ्यातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
ओबीसी समाजाची नेमकी लोकसंख्या किती आहे, याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध होणे आवश्यक आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात शिक्षण, रोजगार, राजकीय प्रतिनिधित्व आणि विकासाच्या योजनांमध्ये न्याय्य वाटा मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘हक्कांसाठी रस्त्यावर उतरू’
मंडलने दिलेले अधिकार सहजासहजी मिळालेले नाहीत. त्यासाठी अनेकांनी संघर्ष केला आहे. ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत लढत राहतील, असा निर्धार वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
“बहुजन-ओबीसी समाजाने आता जागे झाले पाहिजे. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, युवकांच्या रोजगारासाठी, आरक्षणासाठी आणि भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी संघर्ष केला पाहिजे. हक्क मागून मिळत नसतील, तर लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून ते मिळवावे लागतील,” असे ते म्हणाले.
ओबीसींचे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला, तर रस्त्यावर उतरून तीव्र लढा उभारू, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला.
नितीन चंदनशिवेंचीही सरकारवर टीका
समारोपीय कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे यांनी आपल्या प्रभावी वकृत्वातून सरकारच्या बहुजनविरोधी धोरणांवर टीका केली. बहुजन समाजाने एकजूट आणि संघटित शक्तीच्या बळावर आपल्या हक्कांसाठी संघर्ष उभारावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास पदवीधर शिक्षक आमदार अभिजित वंजारी, प्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे, मंडल यात्रा संयोजक उमेश कोराम, काँग्रेस अनुसूचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिरुद्ध वनकर, विनायक बांगडे, अनिल डहाके, ॲड. विलास माथनकर, विजय टोंगे, उपमहापौर प्रशांत दानव, नंदू नगरकर, ॲड. सातपुते, बाळाभाऊ खोब्रागडे, दीप्ती सोनटक्के, प्रवीण पडवेकर यांच्यासह ओबीसी मंडल यात्रेतील कार्यकर्ते आणि हजारो नागरिक उपस्थित होते.