बीडच्या सर्वांगीण विकासासाठी शासन खंबीर; विकासाच्या प्रवासात बीडकरांनी साथ द्यावी; सुनेत्रा पवार

महाराष्ट्र

बीड: राज्य सरकार शिक्षणासह आरोग्याला प्राधान्य देत असून ‘सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’ घडवण्याचा संकल्प आहे. बीडच्या सर्वांगीण विकासासाठी शासन खंबीरपणे काम करत असून, या विकासाच्या प्रवासात सर्व बीडकरांनी साथ द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

बीड जिल्ह्याच्या विकासाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’अंतर्गत जिल्ह्यातील ९६ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात ७११ कोटी रुपये जमा करून त्यांचा सातबारा कोरा करण्यात आला आहे. पुढील टप्प्यात आणखी शेतकऱ्यांचे सातबारे कोरे होणार असून, त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने तातडीने ॲग्री स्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाने १,४५९ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. त्यापैकी आतापर्यंत ९ लाख २२ हजार ३६२ बाधित शेतकऱ्यांना ६३४ कोटी रुपयांचे अनुदान डीबीटीद्वारे वितरित करण्यात आले आहे.

‘महाराष्ट्र राज्य सेवा हक्क कायद्याच्या’ अंमलबजावणीत बीड जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २०२५-२६ मध्ये प्राप्त झालेल्या सुमारे ६ लाख ८८ हजार अर्जांपैकी ९९ टक्क्यांहून अधिक अर्ज वेळेत निकाली काढण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा सरकारतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. या कामगिरीबद्दल सुनेत्रा पवार यांनी संपूर्ण जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले.

बीड जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला नवी चालना देण्यासाठी ऑलिम्पिक पदकविजेते स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा यंदा बीड जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार आहे. तसेच बीडच्या क्रीडा संकुलाच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २१ ऑगस्टदरम्यान राज्यात जलसंधारण सप्ताह राबविला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून बीड जिल्ह्याला अधिक समृद्ध, हरित आणि पाणीदार बनवण्याचा संकल्प करूया, असेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

पाटोदा तालुक्यातील जरेवाडी जिल्हा परिषद शाळा ही गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे उत्तम उदाहरण आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जरेवाडीच्या आदर्श शाळेचे कौतुक केले होते. याच धर्तीवर बीडमधील शैक्षणिक प्रवाह अधिक गतिमान करण्याचा मानस सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत