शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असून, रब्बी हंगामाचीही चिंता सतावत आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. चारा, पिण्याचे पाणी आणि शेतीच्या भवितव्याची चिंता घेऊन बळीराजा अक्षरशः मेटाकुटीला आला असताना, दुसरीकडे तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि काही राजकीय मंडळी मात्र वाढदिवस, फ्लेक्सबाजी, बॅनरबाजी आणि जाहिरातबाजीच्या झगमगाटात मश्गुल असल्याचे चित्र दिसत आहे.
शिरुर तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतात पिके करपली, उत्पादन घटले आणि घरचा खर्च भागविण्याची चिंता निर्माण झाली. मात्र, याच काळात राजकीय शक्तिप्रदर्शनासाठी होणाऱ्या खर्चावरुन शेतकऱ्यांमध्ये दबक्या आवाजात सुरु असुन ‘बळीराजा संकटात असताना लोकप्रतिनिधी असलेल्या निष्क्रिय नेत्यांच्या वाढदिवसाला एवढा थाट कशासाठी…?’ असा थेट संतप्त सवाल आता शेतकरी विचारत आहेत.
राज्य सरकारने शिरुर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केलेला असताना, दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांना अपेक्षित गती मिळते आहे का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, चाऱ्याचा प्रश्न, शेतकऱ्यांना मदत आणि शेतीसाठी उपलब्ध पाण्याचे नियोजन या मूलभूत प्रश्नांवर ठोस कृतीची गरज असताना राजकीय प्रसिद्धीला महत्त्व दिले जात आहे.
View this post on Instagram
घोडगंगा कारखान्याचा प्रश्न कधी सुटणार…?
शिरुर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरु करण्याचा प्रश्नही अद्याप चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. कारखाना सुरु होण्याबाबत आश्वासने देण्यात आली; मात्र प्रत्यक्षात काय हालचाली झाल्या आणि शेतकऱ्यांना त्याचा किती फायदा झाला हा संशोधनाचा विषय आहे. कारखान्याचा प्रश्न मार्गी लावण्याऐवजी राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि एकमेकांवर चिखलफेक करण्यातच वेळ जात असल्याची नाराजी शेतकरी व्यक्त करत आहेत. कारखाना कधी सुरु होणार, ऊस उत्पादकांचे नुकसान कोण भरुन काढणार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला जबाबदार कोण…? या प्रश्नांची ठोस उत्तरे शेतकऱ्यांना हवी आहेत.
दुष्काळात फ्लेक्सचा सुकाळ…
एका बाजूला शेतकरी पाण्यासाठी धावाधाव करतोय, जनावरांसाठी चाऱ्याची चिंता करतोय आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यांच्या कडेला नेत्यांच्या वाढदिवसाचे भलेमोठे फ्लेक्स झळकत आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या जाहिरातींवर होणारा खर्च पाहता, हा पैसा दुष्काळग्रस्तांसाठी वापरता आला नसता का…? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. चारा छावण्या, पिण्याच्या पाण्याचे टँकर, जनावरांसाठी चारा, शेतकऱ्यांना तातडीची मदत आणि शेतीसाठी पाणी या बाबींना प्राधान्य देण्याची गरज असताना राजकीय प्रसिद्धीच्या झगमगाटावर होणारा खर्च शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
जनता पाहतेय; फक्त निवडणुकीपुरतीच आठवण नको
निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आश्वासने देणारे नेते संकटाच्या काळातही त्याच ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात का, हा खरा प्रश्न आहे. मत मागताना बळीराजा केंद्रस्थानी आणि संकटाच्या काळात मात्र प्रसिद्धीचे राजकारण, अशी परिस्थिती राहिली तर जनतेत नाराजी निर्माण होणे स्वाभाविक आहे.
शिरुरचा शेतकरी आज कोणत्याही राजकीय तमाशाचा प्रेक्षक नाही. तो सर्व काही पाहत आहे, अनुभवत आहे आणि प्रश्नही विचारत आहे. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी प्रत्यक्ष कोण उभे राहिले आणि केवळ प्रसिद्धीसाठी कोण पुढे आले, याचा हिशेब जनता आपल्या पद्धतीने ठेवत असल्याचा सुर तालुक्यात ऐकू येत आहे.
दुष्काळ हा राजकीय प्रसिद्धीचा विषय नसून हजारो कुटुंबांच्या जगण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या फ्लेक्सपेक्षा शेतकऱ्यांच्या शेतात पाणी, जनावरांच्या गोठ्यात चारा आणि संकटग्रस्त कुटुंबांच्या हातात मदत दिसणे गरजेचे आहे. आता घोषणांपेक्षा कृती आणि प्रसिद्धीपेक्षा मदत, अशीच शिरुरच्या बळीराजाची अपेक्षा आहे.
शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेनेचा मदतीचा हात; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू
दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ