mahavitaran-advt

करडे-कारेगाव रस्त्यालगत विद्युत खांबांवर प्लॉटिंग, जमीन-विक्रीच्या जाहिरातींचा सुळसुळाट; महावितरणची यंत्रणा नेमकी करतेय काय…?

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : करडे-कारेगाव रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेले महावितरणचे विद्युत खांब सध्या वीजपुरवठ्यापेक्षा प्लॉटिंग आणि जमीन-विक्रीच्या जाहिरातींसाठी अधिक चर्चेत आले आहेत. रस्त्यालगत असलेल्या अनेक विद्युत खांबांवर विविध प्लॉटिंग प्रकल्प, जमीन-विक्रीच्या जाहिरांतीचे होल्डिंग लावण्यात आल्याचे चित्र दिसत असून, सार्वजनिक मालमत्तेचा अशा प्रकारे खासगी जाहिरातींसाठी वापर होत असताना महावितरणचे संबंधित अधिकारी नेमकी कोणती भूमिका घेत आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

करडे-कारेगाव मार्गावरुन दररोज मोठ्या प्रमाणात रांजणगाव औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या हजारो कामगारांची तसेच नागरिकांची आणि वाहनांची ये-जा सुरु असते. त्यामुळे या मार्गालगतच्या विद्युत खांबांचा वापर फुकटच्या जाहिरातींसाठी करण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. एखाद्या खांबावर एक जाहिरात, तर काही ठिकाणी त्याच खांबावर अनेक जाहिराती चिकटविलेल्या दिसतात. परिणामी विद्युत खांबांचा मूळ उद्देश झाकोळला जात असून, रस्त्यालगतच्या परिसराचे विद्रूपीकरणही होत आहे.

‘हक्काची जागा’ नेमकी कोणाची…?
प्लॉटिंगच्या जाहिरातींमध्ये नागरिकांना ‘आपली हक्काची जागा’, ‘स्वप्नातील घरासाठी योग्य प्लॉट’ अशा आकर्षक घोषणा करुन जमीन खरेदीसाठी प्रवृत्त केले जाते. मात्र, या जाहिराती लावण्यासाठी महावितरणच्या विद्युत खांबांची जागा नेमकी कोणाच्या परवानगीने वापरली जाते, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

महावितरणच्या मालमत्तेचा वापर खासगी व्यावसायिक जाहिरातींसाठी करण्याची परवानगी संबंधित जाहिरातदारांना आहे का…? असल्यास ती कोणत्या नियमांतर्गत देण्यात आली आहे…? आणि परवानगी नसेल तर जाहिराती लावणाऱ्यांवर कारवाई का होत नाही? असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

महावितरणला जाहिराती दिसत नाहीत का…?
करडे-कारेगाव रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबांवर मोठ्या प्रमाणात जाहिराती लावण्यात येत असताना त्या संबंधित महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या नजरेतून कशा सुटतात, असा सवालही केला जात आहे. वीजवाहिन्या, खांब आणि इतर विद्युत यंत्रणेची नियमित पाहणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या जाहिराती दिसत नाहीत का…? की दिसूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

महावितरणकडून विद्युत यंत्रणेच्या सुरक्षिततेबाबत वारंवार जनजागृती केली जाते. मात्र, त्याच विद्युत खांबांवर अनधिकृत पद्धतीने कागद, बॅनर, फ्लेक्स अथवा इतर साहित्य चिकटविले जात असेल, तर त्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.

वीज खांब की जाहिरातींचे फलक…?
विशेष म्हणजे, काही ठिकाणी जुन्या जाहिरातींच्या वर नव्या जाहिराती लावण्यात आल्याने विद्युत खांब अक्षरशः जाहिरातींच्या थरांनी झाकलेले दिसतात. त्यामुळे सार्वजनिक पायाभूत सुविधांचा खासगी व्यावसायिक वापर होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

एकीकडे शहर, गाव आणि मुख्य रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जातात; दुसरीकडे सार्वजनिक मालमत्तेवर अशा पद्धतीने जाहिरातींचा बाजार भरत असेल, तर संबंधित विभागांची जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

महावितरणने ‘कारवाईचा स्विच’ ऑन करावा…
करडे-कारेगाव रस्त्यालगतच्या सर्व विद्युत खांबांची पाहणी करुन त्यावर लावण्यात आलेल्या जाहिराती तातडीने हटवाव्यात. अनधिकृत जाहिराती लावणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा व्यावसायिकांची माहिती घेऊन नियमानुसार कारवाई करावी. तसेच भविष्यात विद्युत खांबांचा जाहिरातींसाठी वापर होणार नाही, यासाठी नियमित पाहणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

महावितरणचे खांब वीजपुरवठ्यासाठी आहेत की प्लॉटिंगच्या जाहिरातींसाठी? हा साधा प्रश्न आता संबंधित अधिकाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. या प्रकाराकडे दुर्लक्ष कायम राहिल्यास सार्वजनिक मालमत्तेचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांना अप्रत्यक्ष प्रोत्साहन मिळणार नाही का, याचाही विचार महावितरणने करणे आवश्यक आहे.

करडे-कारेगाव रस्त्यावरील या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. जाहिरातींच्या या ‘हक्काच्या जागे’वर महावितरणचा कारवाईचा हात कधी पडणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

करडे-कारेगाव रस्त्यावरील विजेचे खांब बनले जाहिरातींचे केंद्र; प्रशासनाचे दुर्लक्ष…?

पुणे-अहमदनगर महामार्गावरील दिशादर्शक फलकाचा जाहिरातीसाठी सर्रास वापर…

Video : रांजणगावमध्ये नोकरीच्या आमिषाने मोठी फसवणूक; ६० तरुणांची सुटका, दोघे ताब्यात

शिरूर हादरलं! लॉजमध्ये युवतीवर 7 जणांचा आळीपाळीने अत्याचार; पाहा नावे…

कारेगावच्या १९ ‘भिशां’ चा गुंता; करोडोंच्या व्यवहारामागे नेमके कोण…? नवले कुटुंबीयांपलीकडेही तपासाची गरज…?

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत