शिरुर (तेजस फडके): सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधक ठरणाऱ्या तसेच गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या शिक्रापुर येथील धोकादायक इसमावर महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती आदींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतच्या अधिनियमांतर्गत (एमपीडीए) स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. सुरज ऊर्फ मोन्या संजय देडगे (वय २७, रा. चाकण रोड, शिक्रापूर, ता. शिरुर, जि. पुणे) याला ताब्यात घेऊन अकोला येथील मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले आहे.
पुणे ग्रामीण जिल्ह्यातील संघटित व गंभीर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी मागील पाच वर्षांत संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये दाखल गुन्ह्यांमध्ये जामिनावर मुक्त झालेल्या आरोपींचे तसेच त्यांच्याविरुद्ध पुन्हा दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड अद्ययावत करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार सराईत गुन्हेगार, दरोडा, जबरी चोरी, महामार्गावरील लूट, खंडणी, खून, खुनाचा प्रयत्न, अवैध अग्निशस्त्रे व घातक हत्यारे बाळगणारे आणि धोकादायक व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.
या कारवाईच्या अनुषंगाने शिक्रापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या सुरज ऊर्फ मोन्या देडगे याच्याविरुद्ध यापुर्वी घातक हत्यारांनी इच्छापुर्वक जबर दुखापत करुन शिवीगाळ व दमदाटी करणे, संगनमताने खून व खुनाचा प्रयत्न करणे, संगनमताने जबरी चोरी करणे व चोरीच्या मालाची विक्री करणे, घातक हत्यारांनी दुखापत करणे, तसेच दुखापत, हमला किंवा गैरपणे परिरोध करण्याची पुर्वतयारी करुन गृहअतिक्रमण करणे व इच्छापूर्वक दुखापत करून शिवीगाळ व दमदाटी करणे, अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल होते.
त्याच्याविरुद्ध जुन्या भारतीय दंड विधानातील प्रकरणे तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ आणि भारतीय हत्यार कायदा १९५९ अंतर्गत एकूण सहा गंभीर गुन्हे दाखल असल्याने तो सराईत व धोकादायक असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यासाठी तत्कालीन शिक्रापुर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्याकडे प्रस्ताव सादर केला.
या प्रस्तावाचे अवलोकन करुन पोलीस अधीक्षकांनी तो पुढील कार्यवाहीसाठी पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे पाठविला. त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी २० ऑगस्ट २०२६ रोजी आदेश क्रमांक पगम/एमपीडीए/एसआर/१६/०१/२०२६ अन्वये देडगे याला सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कृत्यांपासून प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने एमपीडीए कायद्यानुसार स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी शिक्रापुर पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांची स्वतंत्र पथके तयार करून देडगेचा शोध घेतला. अखेर २३ ऑगस्ट २०२६ रोजी त्याला ताब्यात घेण्यात आले आणि जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अकोला मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले.
हि कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, शिरुर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश बनकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण शिरुर विभागातील पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला.
तसेच पोलीस हवालदार रोहिदास पारखे, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, अमोल नलगे तसेच पोलीस अंमलदार नारायण वाळके आणि शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.