Shikrapur Police Station

शिरुर तालुक्यातील शेतकऱ्याची लाखोंची फसवणूक

क्राईम

शिक्रापूर: विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याला उसतोड कामासाठी कामगार पुरवितो असे म्हणून शेतकऱ्याची तब्बल ६ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक केल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सोमनाथ शेम्पू सोनवणे या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील विश्वनाथ गवारे यांचा शेतीसह उसाचा व्यापार आहे. गवारे यांना नेहमी उसतोडणी साठी कामगार लागत असल्याने ते विविध ठिकाणहून कामगार आणत असतात. गवारे यांची व्यवसायातून सोमनाथ सोनवणे याच्या सोबत ओळख झालेली होती. सोनवणे याने गवारे यांना उसतोड कामगार आणून देतो त्यांना देण्यासाठी उचल द्यावी लागे,ल असे म्हणून तब्बल ६ लाख ४८ हजार रुपये घेतले. त्यानंतर आज कामगार येतील, उद्या कामगार येतील, असे म्हणत कामगार पुरविण्यास टाळाटाळ केली.

मात्र काही केल्या सोनवणे याने कामगार पुरविले नाही तसेच गवारे यांचे पैसे देण्यात देखील टाळाटाळ करु लागला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने विश्वनाथ कोंडीबा गवारे (वय ६०) रा. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सोमनाथ शेम्पू सोनवणे रा. कौळाणे ता. मालेगाव जि. नाशिक याच्या विरुद्ध फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर तेलंग हे करत आहे.