गॅसने भरलेला टँकर विजेच्या खांबावर आदळला अन…

क्राईम

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, शिरुर तालुक्यातील करंदीतील घटना

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील एका कंपनी समोरुन का,कंपन्यांना वीज–पुरवठा करणाऱ्या उच्च दाबाच्या विजेच्या तारांवर चक्क गॅसने पूर्णपणे भरलेला टँकर आदळल्या ची घटना घडली असून कंपन्यांचे सुरक्षा रक्षक व पोलिसांच्या सतर्कतेने दुर्घटना टळली आहे.

करंदी (ता. शिरुर) येथील रेनाटा कंपनी समोरील रस्त्याने (दि. 13) रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास गॅसने पूर्णपणे भरलेला के ए ०१ ए एच ७६५३ हा टँकर चाललेला असताना रेनाटा कंपनीसमोर असलेल्या उच्च दाबाच्या विजेच्या तारांचे खांबावर सदर टँकर आदळला गेला.

यावेळी रेनाटा कंपनीचे सुरक्षारक्षक स्वप्नील शिंदे, देविदास बुंदे, अजित शिवले, अनिल जांभळकर, नितीन पुरी, राजेश खरे, हर्षल मोहिते यांनी तातडीने पोलीस स्टेशन व विद्युत वितरण विभागाला माहिती देण्याची खबरदारी घेतली. या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, पोलीस हवालदार राजेश माने, पोलीस नाईक विकास पाटील, प्रफुल्ल सुतार, विकास मोरे, होमगार्ड योगेश बधे यांनी सदर ठिकाणी धाव घेतली.

विद्युत वितरण विभागाने सर्व विजेचा पुरवठा काही काळ खंडित केला, पोलीस, विद्युत वितरणचे कर्मचारी व कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी तत्परतेने गॅसने भरलेला टँकर सदर बाजूला केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला यावेळी पोलिसांनी टँकर चालकाची चौकशी केली असता चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर आले, तर टँकर सह विजेच्या खांबांचे तसेच तारांचे काही प्रमाणात नुकसान झाले.

याबाबत विद्युत वितरण विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ गणेश हरिदास क्षिरसागर (वय २९) रा. माळी मळा शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी टँकर चालक कोटा सत्य नारायण (वय ४७) रा. इंडिका कॉलनी चीनाबोगोली ता. सितानगर जि. विजयनगर आंध्रप्रदेश याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राकेश मळेकर हे करत आहे.

रस्त्यावर गतिरोधक बसवण्यात यावे: महेश साबळे

करंदी येथील भारत गॅस फाटा ते एल अँड टी फाटा येथील रस्ता वाहन चालकांना सोयीस्कर असल्याने सदर रस्ताने अनेक वाहने सुसाट वेगाने जात असतात. त्यामुळे येथे अनेक अपघात घडत आहेत. मात्र अपघात रोखण्यासाठी येथील रस्त्यांवर गतिरोधक बसवण्याची मागणी अखिल भारतीय माहिती सेवा समितीचे शिरुर तालुकाध्यक्ष महेश साबळे यांनी केली आहे.

मद्यधुंद चालकांकडून 3 दिवसात दुसरी मोठी दुर्घटना…

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर 2 दिवसांपूर्वी एका मद्यधुंद चालकाकडून एका कारला चक्क 2 किलोमीटर ढकलत नेल्याची घटना घडली त्यावेळी देखील मोठी दुर्घटना टळली गेली. तसेच (दि. 13) रोजी पहाटे देखील गॅस घेवून जाणारा टँकर उच्च दाबाच्या विजेच्या तारांवर आदळला त्यामुळे येथे देखील दुर्घटना टळली गेली आहे.