crime

कोरेगाव भीमात व्यक्तीची फसवणूक केल्याप्रकरणी दोघा बिल्डरवर गुन्हे दाखल…

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील जमीन बांधकाम करत विकसित करण्यासाठी घेऊन जमीन मालकाच्या परस्पर जमिनीवर कोट्यावधी रुपयांचे कर्ज काढून जमीन मालकाची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तनवीर जेनुद्दिन मोमीन व सुभाष श्रीहरी दहिफळे या दोघा बिल्डरवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे बाबासाहेब जासूद यांची जमीन असून त्यांनी सदर जमीन तनवीर मोमीन व सुभाष दहिफळे या दोघा बिल्डरांच्या कुबेर प्रॉपर्टी कंपनीला विकसित करण्यासाठी देऊ केली होती. सदर जमीन विकसित केल्यानंतर इमारतीपैकी 70 टक्के बिल्डरांना तर 30 टक्के बाबासाहेब जासूद यांना देण्याचे ठरले होते.

याबाबत तळेगाव ढमढेरे दुय्यम निबंधक कार्यालय येथे २०१७ मध्ये करारनामा नोंदणी देखील करण्यात आलेली होती. त्यानंतर दोघा बिल्डरांनी कुबेर प्रॉपर्टी कंपनीच्या नावाने सदर ठिकाणी बिल्डींग उभी करण्यासाठी कर्ज काढायचे म्हणून शिवाजीनगर पुणे येथील बँक ऑफ इंडियाला काही बनावट कागदपत्रे देऊन बँकेतून तब्बल 5 कोटी 25 लाख रुपये कर्ज काढून घेतले.

दरम्यान बँकेच्या व्यवस्थापका कडून जागा मालक बाबासाहेब जासूद यांना कोणत्याही प्रकारची विचारणा करण्यात आली नाही. मात्र दोघा बिल्डरांनी कुबेर प्रॉपर्टी कंपनीच्या नावाने जासूद यांची जमीन विकसित करण्यासाठी त्यांच्या जमिनीबाबत खोटे कागदपत्र देऊन काढलेले कर्ज दुसरीकडे वापरुन जासून यांची फसवणूक केली.

याबाबत बाबासाहेब बाळासाहेब जासूद (वय ५०) रा. कोणार्कनगर सोसायटी विमान नगर पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी तनवीर जेनुद्दिन मोमीन रां. मांजरी हडपसर पुणे व सुभाष श्रीहरी दहिफळे रा. विमाननगर पुणे या दोघा बिल्डरच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे हे करत आहे.