श्रीगोंदा तालुक्यातील बहादुर गडावर गुप्तधनाच्या अमिषापोटी उत्खनन

क्राईम

श्रीगोंदा (प्रतिनिधी): स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या जाज्ज्वल्य स्वाभिमानाचा साक्षीदार असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील ऐतिहासिक बहादुर गडावरील भग्नावस्थेत असलेल्या हमामखान्यात अनेक दिवसानंतर काही अज्ञात लोकांनी गुप्तधनाच्या अमिषापोटी पुन्हा उत्खनन केले असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून रात्रीच्या वेळेस किल्ल्यावर पुरातत्व विभागाने सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली नसल्याने ही घटना घडली आहे. काही वर्षांपूर्वी दुर्लक्षित असलेल्या या किल्ल्यावर अनेकांनी गुप्तधनाच्या अमिषापोटी बेकायदेशीररित्या उत्खनन केले असल्याने पुरातत्व खाते आणि पुणे येथील शिवदुर्ग संवर्धन समितीने येथे गडपालांची नेमणूक केलेली होती.

पेडगाव येथील बहादुरगडाला मोठा इतिहास असून या किल्ल्याची बरीचशी पडझड झाली असली, तरी तटबंदीचा काही भाग, बुरूज, वेशी, मंदिरे, तसेच महालांचे अवशेष अजून तेथे आहेत. या किल्ल्यावर अनेक दुर्गप्रेमी तसेच अभ्यासक दररोज भेट देण्यासाठी येत असतात. शंभू महाराजांच्या स्वाभिमानाचा साक्षीदार असलेल्या बहादुर गडाच्या संवर्धनासाठी पुरातत्व खाते आणि काही दुर्गप्रेमी काम करीत आहेत. गेल्या काही वर्षांत येथील बेकायदेशीर उत्खनन रोखण्यात यश आले होते. मात्र बहादुर गडावर पुन्हा एकदा अज्ञातांकडून किल्ल्यावरील राणी महालातील हमामखान्यात गुप्तधनाच्या अमिषापोटी बेकायदेशीररित्या उत्खनन करण्यात आल्याचे दुर्ग प्रेमींच्या लक्ष्यात आल्यावर ही बाब त्यांनी पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.

बहादुर गडाच्या संरक्षणासाठी आणि विशेषतः गुप्तधनाच्या अमिषापोटी होणारे उत्खनन रोखण्यासाठी पुरातत्व खाते आणि दुर्गप्रेमींनी तेथे गडपाल नेमलेले असताना तेथे उत्खनन कसे झाले…? असा सवाल गड प्रेमी उपस्थित करत असून बहादुर गडावर उत्खनन करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी दुर्गप्रेमींनी केली आहे.