जातेगाव खुर्दमध्ये रस्त्याच्या वादातून व्यक्तीला मारहाण

क्राईम शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे शेतातील रस्त्याच्या वादातून व्यक्तीला दगडाने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बाजीराव सदाशिव मासळकर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील शेतकरी शिवाजी मासळकर हे पिकअप वाहनात काही महिला घेऊन शेतात मिरच्या तोडण्यासाठी गेले होते. मिरच्या तोडून परत येत असताना शेजारील बाजीराव मासळकर हा व्यक्ती रस्ता नांगरत असल्याने शिवाजी यांची पिकअप बाहेर जाऊ शकत नव्हती. त्यामुळे शिवाजी यांनी रस्ता का नांगराला असे बाजीराव यांना म्हटले असता दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान बाजीराव यांनी शेजारी पडलेला दगड घेऊन शिवाजी यांना मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत शिवाजी सुदाम मासळकर (वय ४2) रा. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी बाजीराव सदाशिव मासळकर रा. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) जि. पुणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे हे करत आहे.