शिक्रापुरात मद्यधुंद कंटेनर चालकाच्या धडकेने व्यक्तीचा मृत्यू

क्राईम शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावर मद्यधुंद टेम्पो चालकाच्या धडकेने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा एका मद्यधुंद कंटेनर चालकाच्या धडकेत प्रकाश अर्जुन ओव्हाळ या इसमाचा मृत्यू झाला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे शिवाजी भिकाजी दातखिळे या मद्यधुंद कंटेनर चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्ग लगत असलेल्या रिलायंस पेट्रोल पंप समोरुन प्रकाश ओव्हाळ हे १५ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना अहमदनगर बाजूने एम एच १२ के पी २२५५ या कंटेनर वरील मद्यधुंद अवस्थेत असलेला कंटेनर चालक भरधाव वेगाने कंटेनर घेऊन आला त्याची रस्ता ओलांडणाऱ्या प्रकाश ओव्हाळ याला जोरदार धडक बसून अपघात प्रकाश ओव्हाळ रस्त्यावर दुभाजकावर पडून गंभीर जखमी झाले.

दरम्यान कंटेनरचालक पळून गेला. मात्र पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांना अपघाताबाबत माहिती मिळताच पोलीस शिपाई प्रतिक जगताप यांनी कंटेनरचा पाठलाग करत स्थानिक नागरिकांच्या मदतीने कंटेनर चालाकला पकडून ताब्यात घेतले, तर जखमीला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी प्रकाश अर्जुन ओव्हाळ रा. त्रिमूर्ती कॉलनी शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

तर घडलेल्या प्रकाराबाबत प्रसाद अर्जुन ओव्हाळ (वय ३०) रा. त्रिमूर्ती कॉलनी शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी एम एच १२ के पी २२५५ या कंटेनर वरील मद्यधुंद चालक शिवाजी भिकाजी दातखिळे (वय ३९) रा. मुथाळी ता. अकोले जि. अहमदनगर याचे विरुद्ध गुन्हे दाखल करत त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश माने हे करत आहे.