पुणे नगर मार्गावर कोयत्याच्या धाकाने कुटुंबियांना लुटले

मुख्य बातम्या

शिरुर नजीक न्हावरा फाटा येथील पहाटेची खळबळजनक घटना

शिक्रापूर (शेरखान शेख): नजीक असलेल्या न्हावरा फाटा जवळ पुणे नगर महामार्गालगत असलेल्या नमो फर्निचर मॉल समोर पहाटेच्या सुमारास कोयत्याच्या धाकाने एका कुटुंबियांचे तीन लाखांचे सोन्याचे दागिने व काही रक्कम लुटल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिरुर शहरातील पुणे नगर महामार्गावरुन धन्यकुमार बरमेचा हे पुणे बाजूने अहमदनगर बाजूकडे त्यांच्या एम एच १६ सि वाय ९९२९ या कार मधून ४ जानेवारी त्यांच्या कुटुंबियांना घेऊन जात असताना रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास त्यांची कार पंचर झाल्याने सर्वजण कारच्या खाली उतरलेले असताना अचानक 3 युवक येथे आले व तुम्ही येथे का थांबला आहात, असे म्हणून सर्वांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या जवळील अंदाजे 7 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख 10 हजार रुपये असा 3 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केल्याची घटना घडली.

याबाबत धन्यकुमार मदनलाल बरमेचा (वय ५२) रा. केडगाव ता. अहमदनगर जि. अहमदनगर यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी अज्ञात 3 युवकांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील हे करत आहे.