पुण्याच्या व्यक्तीची शिरुर तालुक्यात फसवणूक; गुन्हे दाखल

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): आमदाबाद (ता. शिरुर) येथील जमीन विक्री करायची आहे असे सांगून पैसे घेऊन एका व्यक्तीची तब्बल 5 लाख 11 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे बाळू पंढरीनाथ नऱ्हे व बाबू बाळू नऱ्हे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

आमदाबाद (ता. शिरुर) येथील बाळू नऱ्हे व बाबू नऱ्हे यांनी २०२१ मध्ये त्यांची शेतजमीन विक्री करण्याबाबत मंगेश भगत यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर भगत यांच्याकडून सदर जमिनीबाबत व्यवहार करुन 5 लाख 11 हजार रुपये देखील भगत यांच्याकडून घेतले. मात्र जमिनीचे खरेदीखत करुन देण्यास टाळाटाळ करु लागले. त्यानंतर वेळोवेळी भगत यांनी नऱ्हे यांच्याशी चर्चा केली.

मात्र नऱ्हे यांनी जमिनीचे खरेदीखत करुन दिले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने मंगेश रामचंद्र भगत (वय ३६) रा. पिंपळे गुरव पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी बाळू पंढरीनाथ नऱ्हे व बाबू बाळू नऱ्हे दोघे रा. आमदाबाद (ता. शिरुर) जि. पुणे या दोघांवर फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले हे करत आहे.