माथाडीच्या नावाखाली आर्थिक लूट करणाऱ्या मूळ सूत्रधारावर कारवाई करुन अटक करा:- बाप्पुसाहेब शिंदे

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC त गेल्या अनेक दिवसांपासुन माथाडीच्या नावाखाली बोगस पावत्या फाडून ट्रक चालकांची “आर्थिक लूट” करणाऱ्या दोन जणांवर आज (दि 6) रांजणगाव पोलिसांनी ट्रक चालकाने फिर्याद दाखल केल्याने खंडणीचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे MIDC त खळबळ उडाली आहे. परंतु माथाडीच्या नावाने बोगस पावत्या बनवुन जबरदस्तीने “आर्थिक लूट” करणाऱ्या बड्या धेंड्याना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचे शिवसेना युवा पुणे जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले.

रांजणगाव MIDC त गेल्या अनेक दिवसांपासुन “राष्ट्रवादी काँग्रेस” पक्षाचे पुढारी सत्तेचा गैरवापर करत आपले राजकीय वजन वापरुन माथाडीच्या नावाखाली खंडणी वसुल करत असल्याबाबत पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अंकीत गोयल, शिरुरचे उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी, रांजणगाव MIDC चे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्याकडे तक्रारी केल्याचे बापुसाहेब शिंदे यांनी सांगितले. तसेच ढोकसांगवी हद्दीतील टाटा स्टील, न्यानको, झामिल स्टील, SKH आणि बजाज या कंपन्यामध्ये माथाडीच्या नावाखाली सर्रास बोगस पावत्या फाडल्या जात असुन या पावती फाडणाऱ्या लोकांच्या डोक्यावर एका “राष्ट्रवादी काँग्रेस” च्या स्थानिक नेत्याचा हात असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळे या गैरप्रकाराबाबत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटुन रांजणगाव MIDC त माथाडीच्या नावाखाली चाललेली बेकायदेशीर “खंडणी वसुली” थांबविण्यासाठी प्रयत्न करणार असुन यापुढे जर कोणी माथाडीच्या नावाखाली “आर्थिक लूट” करत असेल तर ट्रक चालकांनी थेट माझ्याशी 9850038888 या नंबर वर संपर्क साधावा. त्यांना शिवसेनेच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत करण्यात येईल असे आवाहन शिवसेना युवा पुणे जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे यांनी केले आहे.