शिक्रापुर पोलीसांनी घातक हत्यारासह दरोडा टाकणाऱ्या पाच आरोपींना केले गजाआड

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील सणसवाडी येथे पहाटे कामावरुन सुटल्यानंतर बसमधुन एल अँड टी फाटा येथुन तीन कामगार रस्त्याने पायी चालत जात असताना अचानक दोन मोटार सायकलवर आलेल्या पाच चोरटयांनी रात्रीच्या अंधारात तीन कामगारांना धारदार कोयत्याने मारुन टाकण्याची धमकी देवुन त्यांच्या खिशातील मोबाईल, रोख रक्कम असा एकुण १४ हजार ९७० रुपये किंमतीचा ऐवज चोरत पलायन केले होते. त्या पाचही आरोपीना अटक करण्यात शिक्रापुर पोलिसांना यश आले आहे.

 

याबाबत शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सणसवाडी (ता. शिरूर, जि.पुणे) येथे राहणारे हिमांशु ब्रिजेशकुमार पटेल, शिवापन्ना लाला पटेल व त्यांचा मित्र कृष्णाकांत आदिवासी हे तिघेजण (दि 6) रोजी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास कामावरून सुटल्यानंतर बसमधुन सणसवाडी येथे उतरले होते. त्यानंतर एल अँड टी फाटा येथुन घरी वरील तिघेही रोडने पायी चालत जात असताना तेथे अचानक दोन दुचाकीवरुन पाच अनोळखी चोरटे आले. त्या पाचही चोरटयांनी रात्रीच्या अंधारात हिमांशु ब्रिजेशकुमार पटेल, शिवापन्ना लाला पटेल व कृष्णाकांत आदिवासी यांना धारदार कोयत्याने मारून टाकण्याची धमकी देवुन त्यांच्या खिशातील मोबाईल, रोख रक्कम असा एकुण १४ हजार ९७० रुपये किंमतीचा ऐवज दरोडा टाकुन चोरला आणि दुचाकीवरुन पाचही चोरटे पळुन गेले.

 

त्यानंतर हिमांशु ब्रिजेशकुमार पटेल यांनी शिक्रापुर पोलीस स्टेशन येथे तकार दिल्याने दरोडयाच्या गुन्हयाची नोंद झाली होती. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी तात्काळ वरीष्ठांना गुन्हयाची माहीती देत सदर गुन्हयातील आरोपींच्या शोधासाठी दोन स्वतंत्र पथक तयार करुन रवाना केली होती.

 

त्याप्रमाणे शिक्रापुर पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी गुन्हयातील आरोपींचा गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषण करत गुन्हयातील पाचही संशयित आरोपी १ ) श्रीकांत मिनीनाथ मारणे (वय २८ ) रा. कोथरूड, पौडफाटा, हनुमाननगर, शंकरमंदीरा समोर, पुणे, २) रोहीत बाबुराव पवार (वय १८) रा. धायरीफाटा, लाडलीसाडी सेंटर जवळ, पुणे, ३)गणेश नितीन जावडेकर (वय १८ ) रा. रायकरमळा, धावरीनॅनो कॉम्पलेक्स, तिसरा मजला, पुणे, मुळ रा. दत्तवाडी, जनतावसाहत, पर्वती पायथ्या जवळ, पुणे, ४) जितेंद्र शंकर चिंधे (वय ३१ ) रा. दत्तनगर, जांभळवाडी, काकापवार तालीम शेजारी, कात्रज, पुणे, ५) अनिकेत अनिल वाघमारे, (वय २२) रा. नंदनवन कॉलनी, गादीया इस्टेटजवळ, कोथरूड, पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपुस केली असता आरोपींनी गुन्हयाची कबुली दिलेली आहे.

 

तसेच सदर गुन्हयातील आरोपींवर यापुर्वीही खुन, दरोडा, जबरी चोरी, मोटार सायकल चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या आरोपींना अटक करुन शिरुर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना (दि १०) ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली असुन या गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे हे करत आहेत.

 

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलिस निरीक्षक अंकित गोयल, पुण्याचे अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापुर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे, नितीन अतकरे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे यांच्यासह सहायक फौजदार जितेंद्र पानसरे, पोलिस हवालदार शंकर साळुंके, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, पोलिस नाईक विकास पाटील, कृष्णा व्यवहारे, रोहीदास पारखे, शिवाजी चितारे, पोलिस कॉन्स्टेबल जयराज देवकर, किशोर शिवणकर, निखील रावडे यांच्या पथकाने केली आहे.