माजी सैनिकाची फसवणूक करणारे तिघे अटक

क्राईम मुख्य बातम्या

माजी सैनिक संघटनेच्या मोर्चा नंतर शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई

शिक्रापूर (शेरखान शेख): वरुडे (ता. शिरुर) येथील एका माजी सैनिकाच्या पत्नीची जमीन खरेदीमध्ये लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडल्यानंतर गुन्हा अटक होत नसल्याने माजी सैनिकांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढल्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी तातडीने सैनिक पत्नीची फसवणूक करणाऱ्या तिघा आरोपींना अटक केली आहे.

वरुडे (ता. शिरुर) येथील सेवानिवृत्त सैनिकाची पत्नी असलेल्या सारिका शिंगाडे यांनी गावातील सदाशिव देवराम शिंगाडे, सीताबाई लालू शिंदे व राधाबाई रामचंद्र कोळपे यांच्याकडून काही जमीन विकत घेत खरेदीखत केलेले असताना देखील आरोपींनी सदर जमीन अन्य व्यक्तीला विकून सारिका शिंगाडे यांची फसवणूक केल्याची घटना घडल्याने सारिका सीताराम शिंगाडे (वय ५२) रा. शिंगाडवाडी वरुडे (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादिवरुन पोलिसांनी सदाशिव देवराम शिंगाडे, सीताबाई लालू शिंदे, राधाबाई रामचंद्र कोळपे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले होते.

मात्र गुन्हा दाखल होऊन एक महिना उलटून सुद्धा पोलिसांनी आरोपींना अटक केली नसल्याने संतप्त माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मोर्चा काढून आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी सदर मोर्चाचा धसका घेत सैनिक पत्नीची फसवणूक करणाऱ्या सदाशिव देवराम शिंगाडे रा. शिंगाडवाडी वरुडे (ता. शिरुर) जि. पुणे, सीताबाई लालू शिंदे रा. शिंदेवाडी मलठण (ता. शिरुर) जि. पुणे व राधाबाई रामचंद्र कोळपे रा. हिंगणी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर तिघांना अटक केली.

अटक केलेल्या तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांची रवानगी येरवडा कारागृहात केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे व पोलीस नाईक अमोल नलगे हे करत आहे.