करडे येथील राजाराम जाधव यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): करडे (ता.शिरुर) येथील राजाराम विठ्ठलl जाधव यांचे शुक्रवार (दि 13) हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे आई, पत्नी, २ मुले, ३ मुली, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे, त्यांचा एक मुलगा व सून सध्या युरोपमधील डेन्मार्क देशामध्ये नोकरीला असून, दुसरा मुलगा आणि एक जावई पुणे शहर पोलीस दलात नोकरीला आहे.

करडे हे राजाराम जाधव यांच्या मामाचे गाव होते. वडील लहानपणीच वारल्याने त्यांच्या आईनेच त्यांना मोलमजुरी करुन शालेय शिक्षण दिले. करडे येथील शाळेत कायमस्वरुपी प्रथम क्रमांक मिळवणारा विद्यार्थी म्हणून त्यांची ओळख होती. करडे येथील श्री भैरवनाथ विद्यालय येथे इयत्ता 7 वी व 8 वी मध्ये स्कॉलरशीप मिळवणारे ते पहिले विद्यार्थी होते. त्यांचा इयत्ता 10 वी मध्ये बोर्डाच्या गुणवत्ता यादीत नंबर आला. परंतु आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना कंपनीत नोकरी करावी लागली. पण नोकरी करताना त्यांनी शिक्षण चालूच ठेवलं.

काही वर्षे पुण्यातील पिंपरी येथील टेल्को कंपनीत नोकरी करत त्यांनी शिक्षण पुर्ण केलं. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेत ते नोकरीत रुजू झाले. शिरुर तालुक्यात त्यांनी कुरुळी, करडे, करंजावणे आणि सध्या ते शिंदोडी येथे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम केलं. फक्त 2 महिन्यांनी ते निवृत्त होणार होते. परंतु शुक्रवार (दि 13) रोजी मांढरदेवी काळूबाई येथे दर्शनासाठी गेले असताना दर्शन झाल्यानंतर त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे तिथंच देवीच्या दारात त्यांचे निधन झाले. राजाराम जाधव यांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ होता. त्यांच्या निधनामुळे संपुर्ण करडे, लंघेवाडी, चव्हाणवाडी आणि पंचंक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.