विज्ञान प्रदर्शनात सणसवाडी विद्यालय अव्वल

शिरूर तालुका

आधुनिक अन्न वाढणी पद्धती उपकरण व प्रश्नमंजुषा स्पर्धेत तालुक्यात प्रथम

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील ऋतुजा पंडित दरेकर व अपेक्षिता नवनाथ हरगुडे या दोन विद्यार्थीनींनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग भारत सरकार राज्य विज्ञान संस्था नागपूर, पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग तसेच शिरुर पंचायत समिती आणि विजयमाला इंग्लिश मिडीयम स्कूल शिरुर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तालुका स्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला असून त्यांचे उपकरण आता जिल्हास्तरीय स्पर्धेत सादर होणार आहे.

शिरुर येथे नुकत्याच पार पडलेल्या ५० व्या तालुका स्तरीय विज्ञान व गणित प्रदर्शनात सणसवाडीतील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विद्यालयच्या ऋतुजा पंडित दरेकर इयत्ता नववी व अपेक्षिता नवनाथ हरगुडे इयत्ता बारावी या दोन विद्यार्थीनींनी सहभाग घेत आधुनिक अन्न वाढणी पद्धती हे उपकरण सादर केले. आरोग्य आणि स्वस्थता या विषयानुसार तयार करण्यात आलेल्या या उपकरणाच्या सहाय्याने सार्वजनिक मंगल कार्यालयात त्याचप्रमाणे मोठ्या देवस्थानच्या ठिकाणी कमी वाढप्यांच्या मदतीने जेवण वाढता येणार असल्याने वाढप्यांवर व स्वच्छतेवर होणाऱ्या खर्चात बचत होणार असल्याचे यामध्यामातून दाखवण्यात आले.

सदर विद्यार्थिनींच्या उपकरणाचा तालुक्यात प्रथम क्रमांक आला आहे, या विद्यार्थिनींना व शिक्षकांना जेष्ठ शास्त्रज्ञ के. सी. मोहिते, शिरुरचे गटविकास अधिकारी अजित देसाई, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर, श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र थिटे, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके, सचिव मारुती कदम, उपाध्यक्ष रामनाथ इथापे, प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, अशोक सरोदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले असून सदर विद्यार्थिनींचे उपकरण आता जिल्हास्तरीय स्पर्धेत सादर होणार आहे.

या विद्यार्थिनींचे श्री नरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रंगनाथ हरगुडे, सचिव बाबासाहेब साठे, सणसवाडीच्या सरपंच संगिता हरगुडे, उपसरपंच दत्ताभाऊ हरगुडे, पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर, बाजार समितीचे माजी संचालक दत्ताभाऊ हरगुडे, शिरुर काँग्रेस आय कमिटीचे तालुकाध्यक्ष वैभव यादव यांसह आदींनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. तर या यशाबद्दल बोलताना विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला वाव देण्यासाठी विद्यालयात दरवर्षी विविध विज्ञान उपक्रम राबविण्यात आल्याने सणसवाडी विद्यालय दरवर्षी विज्ञान प्रदर्शनात अव्वल ठरत असल्याचे विद्यालयाचे प्राचार्य बी. डी. गोरे यांनी सांगितले.