मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून दिव्या शिंदेला घराबाहेर काढण्यात आलं होतं. एका टास्कदरम्यान दिव्यानं आक्रमक भूमिका घेत माफी मागण्यास नकार दिला. त्यानंतर तिला आणि राकेशला कन्फेशन रुममध्ये बोलावून बिग बॉसनं समज देण्याचा प्रयत्न केला; मात्र दिव्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिली. अखेरीस बिग बॉसनं तिला घर सोडण्याचा आदेश दिला. हा निर्णय ऐकून घरातील सदस्यांनाही धक्का बसला होता.
दिव्याचा बाहेर मोठा चाहतावर्ग असल्याने तिच्या बाहेर पडण्यावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी ती ‘सिक्रेट रूम’मध्ये असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. दरम्यान, घराबाहेर आल्यानंतर दिव्यानं पहिल्यांदाच एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांशी संवाद साधला आहे.
व्हिडिओमध्ये दिव्या म्हणते, “संपूर्ण महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून आणि परदेशातूनही मला जे आशीर्वाद आणि प्रेम मिळालं, त्याबद्दल मी ऋणी आहे. मी लवकरच तुमच्यासमोर येणार आहे. विषय संपलेला नाही; खरा विषय आता सुरू झाला आहे.” सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हिडिओवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात येत आहेत. “तू घराबाहेर पडल्यापासून आम्ही बिग बॉस पाहणं बंद केलं,” “अब होगा कमबॅक,” “तू वाघीण होतीस, आहेस आणि कायम राहशील,” अशा कमेंट्समधून अनेकांनी दिव्याला पाठिंबा दर्शवला आहे. दिव्यानं व्हिडिओला “विषय संपला? आता तर विषय सुरू झाला…” असं कॅप्शन दिल्याने तिच्या पुढील पावलांबाबत उत्सुकता वाढली आहे.