व्हॅलेंटाइन स्पेशल! ‘वीण दोघातली ही तुटेना’मध्ये रंगणार समर-स्वानंदीचा खास रोमँटिक सोहळा

मनोरंजन

मुंबई: १४ फेब्रुवारीला जगभरात ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा केला जातो. प्रेमाचा हा खास दिवस आता झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघातली ही तुटेना’ मध्येही रोमँटिक आणि भावनिक वळण घेऊन येणार आहे. प्रेक्षकांसाठी मालिकेत खास व्हॅलेंटाइन स्पेशल भाग सादर होणार असून अनेक रंजक घडामोडी पाहायला मिळणार आहेत.

मालिकेत आजी अधिरावर एक खास जबाबदारी सोपवते. जसं ती स्वतः व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याच्या तयारीत आहे, तसंच काहीतरी वेगळं आणि खास समर आणि स्वानंदीसाठीही करावं, असं ती अधिराला सांगते. आजीच्या या सूचनेनंतर अधिरा एक भन्नाट प्लॅन आखते.

या प्लॅननुसार अधिरा समर, स्वानंदी आणि रोहनला तातडीने एका ठिकाणी बोलावते. तिथे पोहोचल्यानंतर त्यांना कळतं की ही एक खास व्हॅलेंटाइन पार्टी आहे. या पार्टीत समर आणि स्वानंदीचे रोमँटिक क्षण प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत. प्रेम, भावना आणि नात्यांची गुंफण असलेला हा भाग नक्कीच प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा ठरणार आहे.

मात्र, या आनंदोत्सवात मल्लिका मात्र मिठाचा खडा टाकण्याच्या तयारीत आहे. तिचा नवा डाव काय असेल? रोहन हे सगळं शांतपणे सहन करेल का? मल्लिकाचा प्लॅन यशस्वी होणार का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आगामी भाग पाहावा लागणार आहे.

अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या ‘वीण दोघातली ही तुटेना’ या मालिकेतील तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. या दोघांमधील ऑनस्क्रीन केमिस्ट्री आणि भावनिक संवाद यामुळेच मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.व्हॅलेंटाइन डे निमित्त रंगणारा हा खास भाग नक्कीच मालिकेच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.